मालेगावी रेमडेसिविरच्या वितरणासाठी समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:14 AM2021-04-14T04:14:04+5:302021-04-14T04:14:04+5:30
शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत नाशिक येथून प्राप्त झालेले रेमडेसिविर प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोपविताना भुसे बोलत होते. उपविभागीय अधिकारी, ...
शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत नाशिक येथून प्राप्त झालेले रेमडेसिविर प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोपविताना भुसे बोलत होते. उपविभागीय अधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक, महानगरपालिकेचे उपायुक्त, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी, खासगी रुग्णालयाचा प्रतिनिधी व औषध विकेत्यांचे प्रतिनिधी अशी समिती स्थापन करावी. या समितीने सर्व कोविड रुग्णालयांचा डाटा एकत्रित करून दाखल रुग्णांपैकी गरजू रुग्णांची माहिती संकलित करावी व गरजू रुग्णांना रेमडेसिविर वाटपाचे सूक्ष्म नियोजन करावे. यामुळे नागरिकांची हेळसांड थांबून गरजू रुग्णांचे प्राण वाचतीलए असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भुसे म्हणाले, रेमडेसिविरबाबत जनजागृतीसह वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राधान्यक्रम ठरवावा. प्राप्त झालेल्या तीनशे रेमडेसिविर पैकी दोनशे सामान्य रुग्णालयासह महानगरपालिका व ग्रामीण भागातील शासकीय कोविड रुग्णालयांना वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले तर शंभर रेमडेसिविर हे खासगी रुग्णालयातील दाखल रुग्णांचा आढावा घेऊन वितरीत करण्यात यावे. दोन दिवसांत अजून २०४ रेमडेसिविर प्राप्त होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याच बरोबर खासगी सिटी स्कॅन सेंटरची आवश्यकतेनुसार तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
इन्फो
मालेगावसाठी आठ ड्युरा सिलिंडर
नाशिक येथील ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपनी चालकांशी केलेल्या चर्चेनुसार व औद्योगिक क्षेत्रासाठी वापरण्यात येणारा ऑक्सिजन हा आरोग्य सेवेसाठी उपलब्ध करण्याबाबत झालेल्या निर्णयानुसार यापुढे ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. मालेगावसाठी आठ ड्युरा सिलिंडरला मान्यता मिळाली असून लवकरच ते प्राप्त होतील, असेही भुसे यांनी सांगितले.