अधिकाऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न सल्लागार कंपनीच्या चौकशीसाठी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:02 AM2020-01-28T00:02:00+5:302020-01-28T00:15:58+5:30

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या सल्लागार कंपनी असलेल्या केपीएमजीच्या कामात अनेक प्रकारचे गोंधळ असून, यामुळे करोडो रुपयांचा भुर्दंड सोसावा ...

A committee to inquire into the advisory company's attempt to overthrow officers | अधिकाऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न सल्लागार कंपनीच्या चौकशीसाठी समिती

अधिकाऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न सल्लागार कंपनीच्या चौकशीसाठी समिती

Next
ठळक मुद्देस्मार्ट सिटीचा निर्णय : चुकीचे खापर पालिका

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या सल्लागार कंपनी असलेल्या केपीएमजीच्या कामात अनेक प्रकारचे गोंधळ असून, यामुळे करोडो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला आहे. मात्र, स्मार्ट सिटीत अधिकारी वर्गाने कंपनी नामांकित असल्याने संबंधितांना समज देऊन मिटवण्याचा प्रयत्न केला. तथापि, स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांनी कंपनीला कोणत्याही प्रकारे रक्कम देण्यास विरोध केला. त्यानंतर कंपनीच्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. कंपनीच्या उणिवा शोधून त्यानंतर कंपनीचा फैसला करण्यात येणार आहे.
स्मार्ट सिटी कंपनीची गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली बैठक सोमवारी (दि.२७) दुपारी राजीव गांधी भवनात पार पडली. यावेळी अन्य विषयांबरोबरच सर्वाधिक ज्वलंत विषय हा केपीएमजी या सल्लागार कंपनीचा होता. कंपनीने सल्लागार म्हणून योजना तयार करणे, त्याची व्यवहार्यता पडताळणे आणि अंमलबजावणी करणे यासाठी तांत्रिक कुशल मनुष्यबळ उपस्थित करून देण्याची जबाबदारी होती. त्यासाठी कंपनीला ३१ कोटी रुपये देण्याचे निश्चित झाले होते. त्यातील पाच कोटी रुपये आत्तापर्यंत देऊन झाले आहेत. परंतु, कंपनीचे सर्व प्रकल्प हे वादग्रस्त ठरले. स्मार्ट रोडचे चुकीचे प्राकलन तयार केल्याने त्यासाठी महापालिकेला नंतर ३ कोटी ८९ लाख रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला. कालिदास कलामंदिरातील सदोष यंत्रणेमुळे वाद झाला. महात्मा फुले कलादालनाच्या कामासाठीदेखील ५० लाख रुपये ज्यादा मोजावे लागले. स्काडा मीटरच्या घोळामुळेदेखील निविदा रद्द करण्याची नामुष्की आली तर गांधी तलावापासून टाळकुटे पुलापर्यंत नदीपात्रातील तळ कॉँक्रिटीकरणाचे काम रोखण्यात आले. चुकीचे सल्ले आणि तांत्रिक दोषामुळे स्मार्ट सिटी कंपनीने केपीएमजीच्या कामकाजावर ठेवला आणि तसा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवला होता. मात्र, त्यावर कंपनीचे अधिकारी मात्र सौम्य भूमिका घेताना आढळले.
कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी सांगितले की, केपीएमजी कंपनीने आवश्यक ते तांत्रिक मनुष्यबळ पुरवले नाही. त्याबाबतची नाराजी कळविण्यात आली आहेत. दरम्यान, स्मार्ट सिटी कंपनीने आयुक्त राधाकृष्ण गमे, कंपनीचे संचालक तथा स्थायी समिती सभापती उध्दव निमसे आणि भास्कर मुंढे यांची चौकशी समिती नियुक्त केल्याची माहिती दिली.

जादा खर्च महापालिकेला भुर्दंड
केपीएमजी कंपनीने सदोष कामे केल्याने कामांचा खर्च वाढला आणि नियमानुसार ज्यादा खर्च हा महापालिकेच्या माथी असल्याने त्याचा भुर्दंड कसा सोसायचा असा प्रश्न केल्यानंतर कुंटे यांनी केपीएमजीकडे मनुष्यबळ नसल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीच तांत्रिक बाबी तपासल्या असल्याचे नमूद केले. त्याचप्रमाणे कंपनीचे प्रस्तावदेखील पालिकेच्या अभियंत्यांनी तपासल्याचे नमूद केल्याने चुकीचे खापर महापालिकेच्या माथी मारण्याचा प्रकार असल्याची चर्चादेखील सुरू झाली आहे.

केपीएमजी कंपनीच्या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. त्यांनी पुरेसे तांत्रिक मनुष्यबळ पुरवले नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली. ही नाराजी वरिष्ठांना कळवण्यात येणार असून त्यानंतर ते तांत्रिक मनुष्यबळ वाढवतील. कंपनीने केलेल्या कामाचे त्यांना बिल देण्यात आले आहे. अन्य रक्कम देण्याबाबत चौकशी समितीच्या मूल्यमापनानंतर निर्णय घेण्यात येईल.
- सीताराम कुंटे, अध्यक्ष,
स्मार्ट सिटी कंपनी

सल्लागार कंपनीच्या कारभाराबाबत मी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाने चौकशी समिती नेमली आहे. मी बैठकीत विरोध नोंदून घेण्यास सांगितले. परंतु इतिवृत्तात इतकी तपशीलाने नोंद केली जात नसल्याचे अजब उत्तर देण्यात आले.
- उद्धव निमसे, अध्यक्ष, स्थायी समिती सभापती

Web Title: A committee to inquire into the advisory company's attempt to overthrow officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.