पुण्याच्या धर्तीवर नाशकातही महापालिका महिला बचतगटांसाठी साकारणार वस्तू विक्री केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 06:43 PM2017-12-11T18:43:45+5:302017-12-11T18:44:39+5:30
महापालिकेचे नियोजन : महिला बालकल्याण समितीचा अभ्यास दौरा
नाशिक - पुणे महापालिकेने महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी राबविलेल्या उपक्रमाच्या धर्तीवर नाशिकमध्येही बचत गटांसाठी केंद्रीय वस्तू विक्री केंद्र उभारण्याचा विचार महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत सुरू असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली.
महापालिकच्या महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांनी नुकतीच पुणे महापालिकेला भेट देऊन तेथे महिलांसाठी राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. या अभ्यासदौ-याविषयी बोलताना उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी सांगितले, पुणे महापालिकेने उत्पादन घेणा-या महिला बचत गटांसाठी वस्तू विक्री केंद्र उभारले आहे. त्यासाठी स्माईल या एनजीओमार्फत सदर महिला बचत गटांच्या वस्तू विक्रीसाठी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तेथील महिला बचत गटांच्या उत्पादनांचा दर्जा कसा उच्चतम राहिल, याचीही दक्षता घेण्यात आलेली आहे. पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिकमध्येही सदर उपक्रम प्राधान्याने राबविण्याचा विचार आहे. नाशिक शहरात महापालिकेकडे उत्पादन करणा-या ७५ महिला बचत गटांची नोंद आहे. या बचत गटांना गुणवत्तापूर्ण वस्तू उत्पादनासाठी सर्वप्रथम प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. नाशिक शहर हे धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने येथे येणा-या यात्रेकरुंच्या दृष्टीने उत्पादन घेण्याबाबत बचत गटांना प्रशिक्षित करण्यात येईल. याशिवाय, महिला बचत गटांना मार्केटिंग आणि पॅकेजिंगचेही प्रशिक्षण दिले जाईल. महापालिकेमार्फत सुमारे एक हजार स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असेल. बचतगटांनी स्वयंनिर्भर व्हावे, हाच हेतू या उपक्रमामागे असल्याचेही दोरकुळकर यांनी सांगितले.
सिमला दौ-यासाठी मिळेना ट्रॅव्हल्स कंपनी
महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीचा सिमला, दिल्ली, आग्रा, अमृतसर या शहरांचाही अभ्यासदौरा आखण्यात आलेला आहे. सदर अभ्यासदौ-यासाठी वाहनापासून ते निवास-भोजन व्यवस्थेसंदर्भात महापालिकेने निविदा प्रक्रिया दोनदा राबविली. पहिल्यावेळी एकाही ट्रॅव्हल्स कंपनीने प्रतिसाद दिला नाही तर दुस-यावेळी केवळ एकच निविदा आली. त्यामुळे, पुन्हा तिस-यांदा निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महापालिकेकडून बिले अदा करण्यात विलंब लागत असल्याने कुणीही ट्रॅव्हल्स कंपनी पुढे येत नसल्याची चर्चा आहे.