राष्ट्र बलाढ्य होण्यास जातीय व्यवस्थेचा अडथळा

By Admin | Published: January 4, 2017 12:29 AM2017-01-04T00:29:18+5:302017-01-04T00:29:29+5:30

वासुदेव गाडे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण

The communalist hindrance to the nation's strengthening | राष्ट्र बलाढ्य होण्यास जातीय व्यवस्थेचा अडथळा

राष्ट्र बलाढ्य होण्यास जातीय व्यवस्थेचा अडथळा

googlenewsNext

नाशिक : देशभरात जातीचे राजकारण फोफावले असून, ही परिस्थिती लवकरात लवकर बदलायला हवी. देशातून याआधीच जाती नाहीशा केल्या असत्या तर भारत देश नक्कीच बलाढ्य राष्ट्र म्हणून ओळखले जाऊ लागले असते, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी मंगळवारी (दि. ३) येथील नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शालिमार येथील आयएमए सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना गाडे यांनी, शिक्षक आणि वाचनालयाचा घनिष्ट संबंध असून समाजासाठी या दोघांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरत असल्याचे सांगताना अनेकदा सुशिक्षित समाज म्हटले जात असताना समाजात होणाऱ्या अत्याचारासारख्या घटनांवर परिणाम का होत नाही, असा सवाल उपस्थित केला.  सुर्वे सार्वजनिक वाचनालयातर्फे देण्यात येणारा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती देताना समाजातील अनाथपण कमी होण्यासाठी कार्य करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच बालके किंवा विद्यार्थीच फक्त अनाथ नसून आपल्या सभोवताली एकटे राहणारे वृध्ददेखील अनाथ असून हे अनाथपण दूर करण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी यावेळी केले. वाचनालयाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी जातीचे राजकारण थांबायला हवे, असे मत व्यक्त केले.
प्रास्ताविक राजू देसले, मानपत्र वाचन डॉ. हेमलता पाटील यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्ना शार्दुल-थोरात यांनी केले. यावेळी व्यासपीठावर राजू देसले, ज्येष्ठ पत्रकार उत्तमराव कांबळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रा. मनोहर जाधव आणि डॉ. सुनीलकुमार लवटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सन्मानार्थी
नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयातर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना दहा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रा. डॉ दिनेश शिरूडे (एम.एस.जी. महाविद्यालय, नामपूर), प्रा. डॉ. विवेक खरे (एस.एम.आर.के. महाविद्यालय, नाशिक), कल्पना क्षीरसागर (जिल्हा परिषद शाळा, लाडची), फ्रान्सिस वाघमारे (सेंट फिलोमिना इंग्लिश स्कूल, नाशिकरोड), नारायण भोये (सर्व इंग्लिश मीडिअम स्कूल, चिखलवाडी, त्र्यंबकेश्वर), मनोज दिंडे (वैशंपायन कला, वाणिज्य आणि विज्ञान रात्र महाविद्याय, नाशिक) यांचा समावेश होता.





 

Web Title: The communalist hindrance to the nation's strengthening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.