विखरणी ग्रामपंचायत कार्यालयात सामुदायिक लक्ष्मीपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 12:35 AM2020-11-16T00:35:08+5:302020-11-16T00:35:37+5:30
येवला तालुक्यातील विखरणी येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने ग्रामपंचायत कार्यालयात दरवर्षी सर्वधर्मीय सामुदायिक लक्ष्मीपूजन करण्यात येते. या दिवशी ग्रामपंचायतने वर्षभरात केलेल्या विकासकांमाचा लेखाजोखा ग्रामस्थांसमोर मांडला जातो.
येवला : तालुक्यातील विखरणी येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने ग्रामपंचायत कार्यालयात दरवर्षी सर्वधर्मीय सामुदायिक लक्ष्मीपूजन करण्यात येते. या दिवशी ग्रामपंचायतने वर्षभरात केलेल्या विकासकांमाचा लेखाजोखा ग्रामस्थांसमोर मांडला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विकासासाठी करण्यात आलेल्या खर्चाचा ताळेबंद गावकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला गेला. संपूर्ण महाराष्ट्रात ही एकमेव ग्रामपंचायत अशी आहे जेथे ग्रामपंचायत कार्यालयात लक्ष्मीपूजन केले जाते. विखरणी ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच मोहन शेलार यांच्या कल्पनेतून ग्रामपंचायत कार्यालयात लक्ष्मीपूजनाची सुरुवात करण्यात आली ती आजतागायत सुरू आहे. शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयात पूजाविधी करून लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर कीर्द, पासबुकपावती पुस्तके, खतावणी आदींचे पूजन करण्यात आले. या वैविध्यपूर्ण उपक्रमात सर्वधर्मीय समाजबांधव सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणित करतात. गावाच्या अधिकाधिक विकासासाठी सर्व नागरिकांनी कर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सरपंच रामदास खुरसने यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले. येवला पंचायत समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मोहन शेलार, दौलत शेलार, यमाजी शेलार, नामदेव पगार, राजेंद्र शेलार, शांताराम खरे, रवींद्र शेलार, रोहित शेलार, बाळू शेलार , काळू खुरसने, गफ्फार दरवेशी, किशोर ननवरे, दयानंद खरे, अरुण खरे, केशव पगार, दत्तू शेलार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.