सामुदायिक विवाह सोहळा : नाशिक जिल्ह्यातील ९६ जोडप्यांचे जुळले रेशीमबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 11:50 PM2018-05-13T23:50:14+5:302018-05-13T23:50:14+5:30
राज्याचे धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेनुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, कर्जबाजारी शेतकरी कुटुंबांमधील वय झालेल्या मुला-मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा राज्यभरात आयोजित केला जात आहे.
नाशिक : नियतीने ज्यांच्या डोक्यावरील पितृछत्र हिरावून घेतले अशा कर्जबाजारी शेतकरी कुटुंबांच्या मुला-मुलींना जीवनसाथी मिळण्याचा प्रश्न ऐरणीवर आला; मात्र धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या संकल्पनेतून समाजातील विविध देवस्थानांसह दानशूरांचे हात पुढे आल्याने जिल्ह्यातील पाच-दहा नव्हे तर तब्बल ९६ जोडप्यांच्या रेशीमगाठी पारंपरिक पद्धतीने समारंभपूर्वक रविवारी (दि.१३) जुळून आल्या.
राज्याचे धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेनुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, कर्जबाजारी शेतकरी कुटुंबांमधील वय झालेल्या मुला-मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा राज्यभरात आयोजित केला जात आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील अशा कुटुंबातील मुला-मुलींचा विवाह शहरातील गंगापूररोडवरील चोपडा लॉन्समध्ये उत्साहात पार पडला. शेतीमधील पिकाला हमीभाव मिळाला नाही किंवा आस्मानी संकटामुळे पीक हाताशी आले नाही त्यामुळे कर्जाचा डोंगर डोक्यावर झाला आणि नाइलाजाने राज्यभरात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.
त्यामुळे अशा आत्महत्याग्रस्त कुटुंबातील तरुण मुला-मुलींच्या लग्नाची समस्या उभी राहिली. या समस्येवर मात करण्यासाठी धर्मदाय आयुक्तांनी राज्यभरात सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या नियंत्रणात जिल्ह्यातील मोठी देवस्थान विश्वस्त संस्था, दानशूर व्यक्तींना एकत्र आणून त्यांच्यामार्फत स्वतंत्ररीत्या न्यासांतर्गत समितीचे गठन करून सामुदायिक विवाह सोहळा राबविण्याची संकल्पना पुढे आणली. या संकल्पनेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरात जिल्हास्तरीय सामुदायिक विवाह सोहळ्यात ९६ जोडपे विवाहबद्ध झाल्याने सुमारे १९२ कुटुंबांची चिंता दूर झाली. प्रत्येक कुटुंबाच्या व-हाडींसाठी भोजनाच्या अद्ययावत व्यवस्थेसह नवजोडप्यांना संसारोपयोगी आवश्यक भेटवस्तूदेखील सामुदायिक विवाह सोहळा समिती, नाशिकच्या वतीने देण्यात आल्या. नववधू-वरांना शुभेच्छा देण्यासाठी सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून खगोलशास्त्रज्ञ पद्मविभूषण जयंत नारळीकर, मंगला नारळीकर, जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर, गणेश देशमुख, एम. एस. बोधणकर, एस. पी. पांडे, आमदार सीमा हिरे, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, विभागीय धर्मदाय सहआयुक्त प्रदीप घुगे उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत सहायक धर्मदाय आयुक्त वैशाली पंडित, दीप्ती कोळपकर, के. एम. सोनवणे यांनी केले.
नाशिक विभागात २१७ जोडपे विवाहबद्ध
राज्यभरात अद्याप ३ हजार ४६ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा अशा पद्धतीने राबविला गेला. नाशिक विभागात जळगावमध्ये ४०, धुळ्यात ५५ तर नंदुरबारमध्ये २६ जोडपे सामुदायिकरीत्या विवाहबद्ध झाले. यंदाचे पहिले वर्ष आहे. यापुढे ही संकल्पना धोरणात्मक निर्णयामध्ये रूपांतरित करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे धर्मदाय सहआयुक्त प्रदीप घुगे यांनी सांगितले.