कोमॉर्बिड रुग्णांनी अधिक दक्षता घेण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 09:16 PM2020-12-03T21:16:27+5:302020-12-03T21:18:50+5:30
नाशिक : जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये या आठवड्यात पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत बाधित आणि मृत्यूमध्ये सर्वाधिक रुग्ण हे विविध आजारांनी ग्रस्त असलेले कोमाॅर्बिड प्रकारातील आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या रुग्णांनी अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रत्ना रावखंडे यांनी सांगितले.
नाशिक : जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये या आठवड्यात पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत बाधित आणि मृत्यूमध्ये सर्वाधिक रुग्ण हे विविध आजारांनी ग्रस्त असलेले कोमाॅर्बिड प्रकारातील आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या रुग्णांनी अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रत्ना रावखंडे यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यात दिवाळीच्या काळात १६ नोव्हेंबरला अवघ्या १०७ रुग्णसंख्येपर्यंत पोहोचलेला आकडा नोव्हेंबर अखेरीसपासून डिसेंबरच्या प्रारंभीच्या आठवड्यात सातत्याने तीनशे आणि चारशेवर पोहोचू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉर्बिड रुग्णांनी अधिक काळजी घेण्याच्या आवश्यकतेवर डॉ. रावखंडे यांनी भर दिला.
प्र. रुग्णसंख्या वाढ हा कशाचा परिणाम आहे, असे वाटते ?
डॉ. रावखंडे - दिवाळीपर्यंत बाधितांचा आकडा खूप खालच्या पातळीवर आला होता. मात्र, दिवाळीच्या काळात बाजारात झालेली गर्दी तसेच उत्सवाच्या माहोलमुळे सामाजिक अंतराचादेखील विसर पडल्याचाच हा परिणाम आहे. मात्र, निदान यापुढे तरी नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
प्र. जिल्ह्याच्या कोणत्या भागात अधिक रुग्ण वाढत आहेत ?
डॉ. रावखंडे - जिल्ह्याच्या सर्व भागांमध्ये रुग्णवाढ दिसून आलेली नसून काही विशिष्ट तालुक्यांमध्येच वाढ दिसत आहे. त्यात नाशिक, निफाड आणि सिन्नर या तालुक्यांतील वाढ सर्वाधिक आहे. तर काही आदिवासी तालुक्यांची वाटचाल शून्याकडे सुरु आहे. त्यामुळे एकीकडे वाढीचे चित्र दिसत असले तरी काही तालुक्यांमध्ये समाधानकारक परिणाम दिसून येत आहे.
प्र. नजिकच्या भविष्यात काही विशेष योजना किंवा अभियान राबविण्यात येणार आहे का?
डॉ. रावखंडे - जिल्ह्यात सध्या शासनाच्या निर्देशानुसार कुष्ठरोग आणि टीबी रुग्ण शोध अभियान सुरु आहे. त्याचबरोबर कोरोनाचे रुग्ण शोधून काढण्याच्या अभियनालादेखील वेग देण्यात आला आहे. त्यात लक्षणे दिसणाऱ्या आणि जनसमूहाशी संबंधित व्यावसायिकांच्या चाचण्या करण्यावर भर देण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यात ६५ टक्के, जानेवारी महिन्यात ७० टक्के तर फेब्रुवारी महिन्यात ७५ टक्के नागरिकांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.