निओ यार्डात, नाशकात कॉम्पॅक्ट मेट्रो धावणार

By Suyog.joshi | Updated: March 4, 2025 13:05 IST2025-03-04T13:04:53+5:302025-03-04T13:05:39+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून दिवास्वप्न ठरलेली निओ मेट्राे सुरू होण्यापूर्वीच आता यार्डात जाणार असून, त्याऐवजी कॉम्पॅक्ट मेट्रो सुरू करण्याबाबत चाचपणी घेण्यात येणार आहे.

Compact metro to run in Nashik | निओ यार्डात, नाशकात कॉम्पॅक्ट मेट्रो धावणार

निओ यार्डात, नाशकात कॉम्पॅक्ट मेट्रो धावणार

गेल्या अनेक दिवसांपासून दिवास्वप्न ठरलेली निओ मेट्राे सुरू होण्यापूर्वीच आता यार्डात जाणार असून, त्याऐवजी कॉम्पॅक्ट मेट्रो सुरू करण्याबाबत चाचपणी घेण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत व महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मनपा आयुक्त मनिषा खत्री, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, वाहतूक सेलचे प्रमुख रवी बागुल यांच्यासह रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करण्यात आली. या चर्चेनुसार याबाबतचा सविस्तर डीपीआर पाठविण्याचा आदेश शासनाने दिला असून, त्यासंबंधी केंद्र शासनाला कळविले जाणार आहे.

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूककोंडीने नाशिककर हैराण झाले असून, दररोज ठिकठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. शहराची लोकसंख्याही २३ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे सततच्या वाहतूककोंडीमुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत. ही वाहतूककोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी निओ मेट्रोची घोषणा करण्यात आली होती, यात अनेक अडथळे आल्याने जवळपास तो विषय आता रद्दच झाला असून, कॉम्पॅक्ट मेट्रोचा नवा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. सध्या कॉम्पॅक्ट मेट्रोची सेवा तैवान येथील तैपेई येथे सुरू आहे.

मार्गात होणार बदल

निओ मेट्रो प्रकल्प देशातील पहिला रबर-टायर्ड मेट्रो प्रणाली प्रकल्प होता, मात्र त्या जागी आता कॉम्पॅक्ट मेट्रो नाशिकला मिळणार आहे. दरम्यान जुन्या मार्गात काही बदल होणार असून, काही नवीन मार्ग देखील कॉम्पॅक्ट मेट्रो प्रकल्पात सामील होणार आहे. यासाठी नव्याने आराखडा पाठविण्याचे आदेश शासनाने दिले आहे. या नव्या प्रकल्पामुळे नाशिकची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे. दरम्यान आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याने स्थानिक पातळीवरून आता आराखडा कधी जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Compact metro to run in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.