महापालिकेत भाजपात दुफळी
By admin | Published: July 14, 2017 01:17 AM2017-07-14T01:17:39+5:302017-07-14T01:17:51+5:30
नाशिक : महापालिकेत पहिल्यांदाच एकहाती सत्ता संपादन करणाऱ्या भाजपात दुफळी निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेत पहिल्यांदाच एकहाती सत्ता संपादन करणाऱ्या भाजपात दुफळी निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत असून, त्याचा प्रत्यय गुरुवारी (दि.१३) स्थायी समितीच्या दालनात गाळेधारकांच्या बैठकीच्या निमित्ताने आला आहे. महापौरांना डावलत स्थायी समिती सभापती, सभागृहनेता व भाजपा गटनेता यांनी गाळेधारकांची बैठक घेत भाडेवाढीबाबत दिलासा देणारा प्रस्ताव तयार करण्याची ग्वाही दिली. महापौरांनाअंधारात ठेवत परस्पर बैठका घेतल्या जात असल्याने भाजपात समांतर सत्ताकेंद्र निर्माण झाले असून, त्यामध्ये अधिकाऱ्यांचाही कोंडमारा होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
महापालिकेत भाजपाने १४ वरून ६६ जागांवर झेप घेतली आणि पहिल्यांदाच एकहाती सत्ता संपादन केली. मात्र, चारच महिन्यांत भाजपात आता पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्षाची बिजे दिसून येत आहेत. प्रारंभी महापौरांनी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेत कामकाजाची चुणूक दाखवायला सुरुवात केली होती. या बैठकांना उपमहापौरांसह भाजपा गटनेत्यांची आवर्जून उपस्थिती असायची. मात्र, सभागृहनेत्याच्या नियुक्तीनंतर परस्पर बैठका घेतल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांत भाजपातील पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र सुप्त संघर्ष बघायला मिळत असून, त्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात चवीने चर्चिली जात आहे. गुरुवारी (दि.१३) त्याचा प्रत्यय गाळेधारकांच्या बैठकीच्या निमित्ताने आला. मनपाच्या गाळेधारकांची बैठक स्थायी समिती सभापतीच्या दालनात घेण्यात आली. या बैठकीला सभापतीसह सभागृहनेता व भाजपा गटनेता तसेच भाजपाचे काही नगरसेवक उपस्थित होते.