द्राक्षांच्या नुकसानीसाठी कंपनीला धरले जबाबदार

By admin | Published: December 23, 2016 12:17 AM2016-12-23T00:17:49+5:302016-12-23T00:18:56+5:30

गुन्हा दाखल : आगामी हंगामासाठी कृषी विभागाचा सावध पवित्रा

The company is responsible for damaging the damages | द्राक्षांच्या नुकसानीसाठी कंपनीला धरले जबाबदार

द्राक्षांच्या नुकसानीसाठी कंपनीला धरले जबाबदार

Next

नाशिक : आगामी रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून विविध खते व बियाण्यांच्या कंपन्याबाबत तपासणी सुरू केली आहे. मागील हंगामात बंगरूळूस्थित कॅमसन बायोटेक्नोलॉजीच्या कॅलनोव्हा या जैविक कीटकनाशकामुळे नुकसान झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे या कंपनीविरोधात कृषी विभागाने रीतसर गुन्हाही दाखल केला आहे.
बंगरूळूस्थित कॅमसन बायोटेक्नोलॉजीच्या कॅलनोव्हा या जैविक कीटकनाशकाची द्राक्ष पिकावरील फुलकिडे व माइट्स या किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी केल्यामुळे द्राक्ष मण्यांवर काळे ठिपके-डाग पडून द्राक्ष पिकाचे नुकसान झाल्याबाबत निफाड तालुक्यात २५६, दिंडोरी तालुक्यात २८, चांदवड तालुक्यात २६ व त्र्यंबकेश्वर तालुक्यात १ अशा एकूण ३११ तक्रारी तालुकास्तरावर पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. ३११ तक्रारींपैकी ८० तक्रारींबाबत शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज मागे घेतले आहेत. उर्वरित २३१ तक्रारींची उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने पाहणी केली आहे. समितीने पाहणी अहवालाची प्रत २३१ तक्रारदार शेतकऱ्यांना दिली आहे. त्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी ग्राहक पंचायत जाण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. याबाबत तक्रार निवारण समितीच्या अहवालातील निष्कर्ष द्राक्ष घडांवर काळे ठिपके मोठ्या प्रमाणावर आढळून आले. द्राक्षमण्यावरील काळ्या ठिपक्यांमुळे व द्राक्षामधील फुलकिडे, तुडतुडे नियंत्रण न झाल्याने द्राक्षांची गुणवत्ता ढासळल्याने द्राक्षांची निर्यात होऊ शकली नाही. तसेच उत्पादित द्राक्ष स्थानिक बाजारपेठेतसुद्धा ग्राहकांच्या पसंतीस उतरणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात ३० ते १०० टक्के घट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. या तक्रारींच्या अनुषंगाने ८६ कीटकनाशक परवान्यांच्या सुनावण्या घेण्यात आल्या. ४८ कीटकनाशक परवाने निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच कॅमसन कंपनीच्या उत्पादक कॅलनोव्हा कीटकनाशकाचा अंश आढळल्याने विभागीय कृषी सहसंचालक यांच्याकडून या कंपनीवर न्यायालयीन दावा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The company is responsible for damaging the damages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.