खटल्यांच्या तुलनेत न्यायाधीशांची संख्या तोकडी, जयंत जायभावे यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 01:43 PM2018-02-23T13:43:03+5:302018-02-23T13:48:28+5:30
वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात फोफावत असून त्यामुळे अनेक खटल्यांची संख्याही मोठी झाली आहे. मात्र प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता सद्यस्थितीत काम करणाऱ्या न्यायाधीशांची संख्या अत्यंत तोकडी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष जयंत जायभावे यांनी केले आहे.
नाशिक : भारतात वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात फोफावत असून त्यामुळे अनेक खटल्यांची संख्याही मोठी झाली आहे. मात्र प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता सद्यस्थितीत काम करणाऱ्या न्यायाधीशांची संख्या अत्यंत तोकडी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष जयंत जायभावे यांनी केले. उभय पक्षांमधील वाद समुपदेशनाने आणि सामंजस्याने सोडविण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि रोटरी क्लब नाशिक (पश्चिम) यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी हॉल गंजमाळ येथे एक ह्यकोर्टाची पायरी चढण्याआधीह्ण या आगळ्या वेगळ्या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा विधी सेवा आयोगाचे सचिव न्यायाधीश सुधीरकुमार बुक्के आणि ज्येष्ठ वकील इंद्रायणी पटणी उपस्थित होते.
जयंत जायभावे म्हणाले, भारतीय दिवाणी प्रक्रिया संहितेचे मध्ये सन २००२ च्या दुरुस्त्यांचा गाभा हा कोर्टात प्रकरण दाखल करण्याच्या आधीपासून, प्रकरणाचे काम कोर्टात चालू असताना पक्षकारांमध्ये सामोपचाराने वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणे हा महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय उभय वकील आणि न्यायालये यांच्यावरील जबाबदारीचीही जायभावे यांनी याप्रसंगी जाणीव करून दिली. न्यायाधीश सुधीरकुमार बुक्के यांनी लोकन्यायालायचे महत्त्व विशद करून त्याबाबतच्या सर्व तरतुदींची माहिती दिली. न्याय मिळणे खर्चिक होत असताना, लोकन्यायालायच्या माध्यमातून खटले सामोपचाराने सोडवण्यावर समाजाने भर देण्याची काळाची गरज असल्याचे सांगितले. वरिष्ठ वकील इंद्रायणी पटणी यांनी कोटुंबिक वादाच्या वाढत्या तक्रारींबाबत चिंता व्यक्त करून कोटुंबिक न्यायालयातील वादाच्या निराकरणासाठी समुपदेशनाची गरज असल्याचे विशद केले. चर्चासत्रात राजेश्वरी बालाजीवाले आणि मनीष चिंधडे यांनी मान्यवरांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल आणि रोटरी क्लब ऑफ वेस्टचे अध्यक्ष सीमा पछाडे यांच्यासह नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.