तोट्याची भरपाई द्या, अन्यथा शहर बस बंद

By admin | Published: January 5, 2017 02:15 AM2017-01-05T02:15:21+5:302017-01-05T02:15:35+5:30

एसटीकडून असमर्थता : महापालिकेला दिला इशारा

Compensate the loss, otherwise the city bus is closed | तोट्याची भरपाई द्या, अन्यथा शहर बस बंद

तोट्याची भरपाई द्या, अन्यथा शहर बस बंद

Next

 नाशिक : तोट्यात चालणारी शहर बस वाहतूक सेवा देण्यास राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुन्हा एकदा असमर्थता व्यक्त केली असून, महापालिकेने गेल्या पाच वर्षांत महामंडळाला झालेल्या सुमारे १०८ कोटी रुपयांच्या तोट्याची भरपाई द्यावी, अन्यथा येत्या १ फेबु्रवारीपासून शहर बससेवा बंद करण्याचा इशारा दिला आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी याबाबतचे पत्र महापालिका आयुक्तांना पाठविले आहे. पत्रात महामंडळाने म्हटले आहे, काही महापालिकांची हद्द वगळता संपूर्ण राज्यामध्ये टप्पानिहाय प्रवासी वाहतूक महामंडळामार्फत चालविली जाते. त्याचप्रमाणे महामंडळ काही महापालिका व नगरपालिकांच्या हद्दीमध्येही शहरी व ग्रामीण भागात सेवा देते.
वास्तविक महापालिका हद्दीमध्ये प्रवासी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेची असून, केवळ सामाजिक बांधिलकी या नात्याने एसटी महामंडळ महापालिका हद्दीत तोटा सहन करत शहरी बससेवा देत आहे. मागील पाच वर्षांत नाशिक शहर बस वाहतुकीसाठी महामंडळामार्फत दैनंदिन सरासरी २०८ नियते व एकूण ८९१.३२ कि. मी. (लाख) वाहतूक सेवा पुरविण्यात आली आहे. त्यातून महामंडळाला सुमारे १०८ कोटी ७१ लाख रुपयांचा तोटा झाला आहे.
सदर शहर बससेवा सद्यस्थितीत चालविली जात असल्याने महामंडळाच्या तोट्यात दिवसेंदिवस भरच पडते आहे. त्यामुळे
महामंडळाची आर्थिक स्थिती खालावत आहे. अशा परिस्थितीत शहरी वाहतूक चालविणे महामंडळाच्या हिताचे नाही. त्यामुळे शहर वाहतुकीमुळे होणाऱ्या तोट्याची भरपाई महापालिकेने महामंडळास द्यावी अन्यथा तोट्यात चालणारी शहर बससेवा दि. १ फेबु्रवारी २०१७ पासून बंद करण्यात येणार असल्याचा इशारा पत्रात देण्यात आला आहे.

Web Title: Compensate the loss, otherwise the city bus is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.