मोबदला पूर्ण, सेवा मात्र अपूर्णच

By Admin | Published: July 21, 2016 09:43 PM2016-07-21T21:43:09+5:302016-07-21T21:44:17+5:30

मनपा सिडको विभाग : प्रभागात घंटागाड्या फिरकतच नसल्याने नागरिकांमध्ये संताप

The compensation is complete, the service is incomplete | मोबदला पूर्ण, सेवा मात्र अपूर्णच

मोबदला पूर्ण, सेवा मात्र अपूर्णच

googlenewsNext

नरेंद्र दंडगव्हाळ सिडको
महापालिकेच्या वतीने दैनंदिन कचरा गोळा करण्यासाठी नागरिकांच्या घरापर्यंत घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून सिडको भागात घंटागाड्या एक दिवसाआड तर प्रभागात चार दिवसांनी फिरत आहेत. यातच आहे त्या घंटागाड्या धक्कास्टार्ट आहेत, तर काहींचे ब्रेक फेल असल्याने त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. घंटागाड्यांची अशी परिस्थिती असल्याने ठेकेदारांना (न) केलेल्या कामांचा मोबदला पूर्ण दिला जात असला तरी त्यांच्याकडून सेवा मात्र अपूर्णच दिली जात असल्याचे दिसून येत आहे.
सिडको प्रभागात ११ प्रभागांसाठी नागरिकांच्या घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी २२ घंटागाड्या असल्या तरी यातील बहुतांशी घंटागाड्यांची अवस्था बिकट झाली आहे. काही घंटागाड्यांचे ब्रेकच फेल आहेत, तर काहींचे टायरच खराब झालेले असून काही नादुरुस्त असल्याचे कारण देत प्रभागात फिरतच नाही. नादुरुस्त घंटागाड्यांचे ब्रेक व्यवस्थित करावे, नवीन बॅटऱ्या टाकून आरटीओ पासिंग करावी, याबाबत मनपाकडून संबंधित ठेकेदारास सांगण्यात येत असले तरी मात्र परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी घंटागाडीच्या चाकाखाली सापडून एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मात्र मनपाला जाग येत नसल्याने महिला व नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकदा घरातील शाळकरी मुलेदेखील कचरा टाकण्यासाठी जात असून, बे्रक फेल घंटागाडीमुळे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक अशी संकल्पना मनपाकडून मांडण्यात येत असली तरी मनपाच्या सिडको भागातील आरोग्य विभागाचे कामकाज अत्यंत ढिसाळ व नियोजनशून्य असल्याचे दिसून येत आहे. सिडको भागात मुख्य रस्त्याबरोबरच ठिकठिकाणी कचरा साचलेला असतो. मनपा कर्मचारी हेदेखील वरवर कामकाज करीत असतानाही याकडे अधिकारी लक्ष देत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सिडको भागात अनियमित घंटागाड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही भागात घंटागाड्या फिरकतच नसून यामुळे नागरिकांना नाइलाजास्तव रस्त्यालगत कचरा फेकून द्यावा लागत आहे. तसेच झाडांचा पालापाचोळा हा घंटागाडीत टाकून घ्यावा, असे मनपाचे तत्कालीन आयुक्तांनी सांगितल्यानंतरही घंटागाडीवरंील चालक पालापाचोळा घेत नाही. मनपाने दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त आठवड्यातून एक दिवस पालापाचोळा उचलण्याची गरज असल्याचेही नागरिकांकडून बोलले जात आहे.

Web Title: The compensation is complete, the service is incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.