पीक कर्जमाफीबरोबरच हवी नुकसानभरपाई
By admin | Published: December 16, 2014 01:45 AM2014-12-16T01:45:10+5:302014-12-16T01:45:36+5:30
विजयश्री चुंबळे, प्रकाश वडजे, शोभा डोखळे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
नाशिक : दिंडोरी तालुक्यासह जिल्'ात झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे मुख्यत्वे द्राक्ष, कांदा व डाळींब उत्पादक अडचणीत सापडला असून, शेतकऱ्यांच्या पीककर्जाला सरसकट माफी देऊन त्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी,अशी मागणी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रविवारी (दि.१४) देवेंद्र फडणवीस चांदवड व दिंडोरी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे तसेच महिला व बालकल्याण सभापती शोभा डोखळे यांनी वेगवेगळी निवेदने दिली. निवेदनात म्हटले आहे की, नाशिक, निफाड, येवला, चांदवड, बागलाण, देवळा, मालेगाव, कळवण, नांदगाव व दिंडोरी तालुक्यात ११ व १२ डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात कांदा, हरभरा, द्राक्षे, डाळिंब, मका, भात, टमाटा, अॅपल बोर, मिरची व भाजीपाला या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची हातची आलेली पिके या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे उद््ध्वस्त झाली आहेत. तरी नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी, यावर्षीचे पीककर्ज माफ करावे, पुढील वर्षीही शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होईल, याचे नियोजन व्हावे, तसेच द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे आदि मागण्यांचा त्यात समावेश आहे.