समस्या समजून घेतल्यास सक्षम पिढी शक्य : पागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:28 AM2020-01-12T00:28:20+5:302020-01-12T01:30:27+5:30
फाजील लाड व बदलत्या सवयींमुळे मुलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य बिघडत चालले आहे. मुलांना भेडसावणाऱ्या समस्या पालकांनी समजून घेतल्यास सक्षम पिढीची निर्मिती शक्य असल्याचे मत प्रख्यात समुपदेशक चंद्रकांत पागे यांनी व्यक्त केले.
मनमाड : फाजील लाड व बदलत्या सवयींमुळे मुलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य बिघडत चालले आहे. मुलांना भेडसावणाऱ्या समस्या पालकांनी समजून घेतल्यास सक्षम पिढीची निर्मिती शक्य असल्याचे मत प्रख्यात समुपदेशक चंद्रकांत पागे यांनी व्यक्त केले.
येथील सीतालक्ष्मी हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विवेकानंद व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ‘मुलांच्या समस्या पालकत्वाला अव्हान’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून संजय कटारे, जिल्हा बॅँक संचालक चंद्रकांत गोगड, पुष्पा लोढा, समितीचे अध्यक्ष अमोल तावडे, किशोर नावरकर आदी उपस्थित होते. वंदे मातरमने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेसमोर अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. योगेश म्हस्के यांनी स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय रत्नाकर धोंगडे यांनी करून दिला. रमाकांत मंत्री यांनी प्रास्ताविक सादर केले.
प्रमुख अतिथींनी मनोगत व्यक्त केले. सध्याच्या धावपळीच्या युगात मुलांना पालकांचे प्रेम मिळत नसल्याने चांगल्या कुटुंबातील मुले नैराश्याच्या आहारी जात आहेत. यावर मात करण्यासाठी आधी पालकांनी आपल्यामध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे चंद्रकांत पागे यांनी सांगितले.
प्रसाद दिंडोरकर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धांत लोढा यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.