दहा टन कांद्यासह जीवनावश्यक वस्तूंचे संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 05:51 PM2018-08-28T17:51:30+5:302018-08-28T17:51:52+5:30
कळवण : केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारत भारती व श्वास फाउण्डेशन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कळवण शहर व तालुक्यातून वस्तू स्वरूपात मदतीचा ओघ सुरू झाला असून, दहा टन कांद्यासह, साखर, गहू, बाजरी, तांदूळ, बाजरी, तेलडबा आदी किराणा तसेच जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या आहेत. भारत भारती व श्वास फाउण्डेशनच्या माध्यमातून रेल्वेने या वस्तूंची वितरण व्यवस्था करण्याचे नियोजन असल्याचे श्वास फाउण्डेशनचे अध्यक्ष विजय पाळेकर, कार्याध्यक्ष मकरंद वाघ यांनी सांगितले.
केरळवासीयांच्या मदतीसाठी भारत भारती या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला असून, श्वास फाउण्डेशनच्या पुढाकारातून कळवणमधून दहा टन कांदा कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती, कांदा व्यापारी असोसिएशन व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी भारत भारतीकडे सुपूर्द केला आहे.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव व शहरप्रमुख साहेबराव पगार , विनोद मालपुरे, किशोर पवार यांनी शिवसेनेच्या माध्यमातून भारत भारती व श्वास फाउण्डेशन यांच्याकडे किराणा वस्तूंच्या रूपाने मदत दिली. शिवसेनेने साखर,गहू, तांदूळ, बाजरी, तेलडबा, बेसन आदींसह किराणा वस्तू स्वरूपाची मदत श्वास फाउण्डेशनकडे सुपूर्द केली.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकरी बांधवांना भारत भारती, श्वास फाउण्डेशन व बाजार समिती, कांदा व्यापारी यांच्या वतीने आवाहन करण्यात आले. शेतकरी बांधवांनी कांदा लिलाव दरम्यान आवाहनाला प्रतिसाद दिल्यामुळे कळवणमधून दहा टन कांदा जमा झाला. बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, उपसभापती सुनील देवरे, संचालक हेमंत बोरसे, योगेश महाजन, हरिश्चंद्र पगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, विष्णू बोरसे, भाजपाचे गोविंद कोठावदे, भूषण शिरोडे, कांदा व्यापारी शरद गांगुर्डे, कांदा उत्पादक देवीदास शिंदे, मुन्ना पगार, दीपक वाघ, संतोष पगार, श्रीधर वाघ, दिनकर जाधव व नानाजी मोरे यांनी यावेळी शेतकरी बांधवांकडून कांदा संकलन करून श्वास फाउण्डेशनकडे जमा केला.
--------------------
केरळ पूरग्रस्तांसाठी कळवण बाजार समिती, कांदा व्यापारी व शेतकरी बांधवांच्या माध्यमातून कांदा व जीवनावश्यक वस्तू भारत भारती व श्वास फाउण्डेशन यांच्याकडे सुपूर्द करताना बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, हरिश्चंद्र पगार, विष्णू बोरसे, राजेंद्र भामरे, योगेश महाजन , हरिश जाधव, विजय पाळेकर, मकरंद वाघ, गोविंद कोठावदे, भूषण शिरोडे आदी.