वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील व्हेंटिलेटरमधील झुरळाने मृत्यू झाल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:45 AM2018-04-26T00:45:50+5:302018-04-26T00:45:50+5:30
शहरातील मविप्र संस्थेच्या आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील एका महिला रुग्णाला लावलेल्या व्हेंटिलेटरच्या वरील किटमध्ये चक्क झुरळ आढळून आल्याने खळबळ उडाली. मयत महिला रुग्णाच्या नातेवाइकांनी वैद्यकीय प्रशासनाचा हलगर्जीपणा मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप केला; मात्र रुग्णालय प्रशासनाने त्यांचा आरोप खोडून काढला आहे.
नाशिक : शहरातील मविप्र संस्थेच्या आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील एका महिला रुग्णाला लावलेल्या व्हेंटिलेटरच्या वरील किटमध्ये चक्क झुरळ आढळून आल्याने खळबळ उडाली. मयत महिला रुग्णाच्या नातेवाइकांनी वैद्यकीय प्रशासनाचा हलगर्जीपणा मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप केला; मात्र रुग्णालय प्रशासनाने त्यांचा आरोप खोडून काढला आहे. शहरातील सुपर स्पेशालिटी व सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असलेला मविप्रचे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मागील अनेक वर्षांपासून जनतेच्या आरोग्य सेवेत आहे; मात्र या रुग्णालयात रविवारी (दि. २२) एका महिलेचा उपचारादरम्यान रात्री अतिदक्षता विभागात मृत्यू झाला. यावेळी या महिलेच्या नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत प्रकृतीत सुधारणा होत असताना व्हेंटिलेटरची गरज का उद्भवली आणि रुग्ण दगावला कसा, असा प्रश्न उपस्थित करत जे व्हेंटिलेटर लावले गेले त्यामध्ये झुरळ फिरत असल्याचेही निदर्शनास आणून दिले. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावरून सोमवारी चांगलाच व्हायरल झाला. यानंतर माध्यमांनी या व्हिडीओची दखल घेत वृत्त प्रसारित केल्याने खळबळ उडाली. महिला रुग्णाचा मृत्यू झुरळ व्हेंटिलेटरच्या किटमध्ये आल्यामुळे मुळीच झाला नसल्याचा दावा रुग्णालयाच्या प्रशासनाने केला आहे. नातेवाइकांनी केलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे, तर दगावलेल्या महिला अंजली शंकर बैरागी (४५, रा. पंचवटी) यांचा मुलगा धीरज याने डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या आईचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान, विषारी औषधाचे सेवन क रत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने बैरागी या अत्यवस्थ झाल्याने त्यांना मंगळवारी (दि. १७) रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अडथळा नाही
व्हेंटिलेटरमध्ये झुरळ दिसत असले तरी त्यामुळे हवेच्या दाबाला कुठलाही अडथळा येऊ शकत नाही. कारण हवेचा दाब हा अधिक असतो व त्यामुळे श्वासोच्छ्वास सुरळीत होण्यास मदत होते. मयत महिलेने विषारी औषध सेवन केले असल्यामुळे अचानकपणे त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले होते, जेणेकरून श्वासोच्छ्वासाला अडथळा येऊ नये. दरम्यान, जेव्हा त्यांचे हृदयाचे ठोके बंद पडले तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित के ले व त्यानंतर व्हेंटिलेटर काढण्यात आले, अशी माहिती महाविद्यालय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी दिली.
नाशिकमधील एका वैद्यकीय महाविद्यालयातील व्हेंटिलेटरमध्ये झुरळ आढळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी व चिंताजनक आहे. भाजपा सरकारने राज्यासह देशाच्या आरोग्यव्यवस्थेला व्हेंटिलेटरवर नेऊन ठेवले आहे. नाणारसारखे प्रकल्प रेटून नेण्याऐवजी राज्यासह देशाची आरोग्यवस्था सुधारून ती अधिकाधिक बळकट करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांनी नाशिकला दत्तक घेतले आहे, अशा त्यांच्या दत्तक शहरात अशी घटना घडणे निंदनीय आहे. - संजय राऊत, खासदार, शिवसेना