वोक्हार्ट हॉस्पिटलविरुद्ध जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
By admin | Published: May 20, 2014 01:11 AM2014-05-20T01:11:18+5:302014-05-20T01:11:18+5:30
नाशिक : वोक्हार्ट हॉस्पिटलच्या वागणुकीबाबत जिल्ह्यातील सर्व कर्मचारी संघटनांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन.
नाशिक : राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर सोनारीकर यांच्यावर उपचार करणार्या व नंतर त्यांना मयत म्हणून घोषित करणार्या वोक्हार्ट हॉस्पिटलच्या वागणुकीबाबत जिल्ह्यातील सर्व कर्मचारी संघटनांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ११ एप्रिलपासून सोनारीकर हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वेळोवेळी हॉस्पिटलकडून सांगण्यात आले. मात्र १७ मे रोजी सकाळी दहा वाजता पेशंट दगावला आहे, त्याला घरी घेऊन जा व बिलाची रक्कम भरा, असे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले. त्यानुसार सोनारीकर यांचे नातेवाईक, कुटुंबीय व संबंधितांनी सायंकाळी सात वाजता अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. हॉस्पिटलने उपचार काळात जवळपास नऊ लाख ८० हजार इतके बिल काढले होते. त्यातील पाच लाख ६० हजार रुपये भरण्यात आले व सुमारे दोन लाखाचा मेडिक्लेम होता; परंतु हॉस्पिटलने अडीच लाख रुपये भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नाही, असे सांगितले. त्यावर पावणेदोन लाख रुपये भरण्यात आले व मृतदेह ताब्यात मागितला असता, हॉस्पिटलने ‘पेशंट अजून जिवंत आहे, आम्ही मृत्यूचा दाखला देऊ शकत नाही. पेशंटचा मृत्यू कधी होईल हे आम्ही सांगू शकत नाही. तुम्ही त्यांना घेऊन जा व तुमच्या फॅमिली डॉक्टरकडून मृत घोषित करून दाखला घ्या’ असा सल्ला दिला. त्यावर हॉस्पिटलशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सव्वासहा वाजता सोनारीकर यांचे व्हेंटिलेटर काढले व त्यांना स्ट्रेचरवर व्हरांड्यात आणून ठेवले. त्यानंतर जवळपास अर्ध्या तासाने त्यांची प्राणज्योत मालवली. उपरोक्त घटनाक्रम पाहता हॉस्पिटल प्रशासनाने निर्दयीपणे वागणूक दिली व बिलाची रक्कम मिळेपर्यंत सोनारीकर यांच्या मृत्यूचा बनाव उभा केला आहे. हे पाहता हॉस्पिटलची चौकशी करावी, राज्य सरकारचे हजारो कर्मचारी या हॉस्पिटलशी जोडले गेले असल्याने तो संबंध रद्द करावा, सोनारीकर यांच्या कुटुंबीयांकडून वसूल केलेली जादाची रक्कम परत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)