सुरगाण्यात गैरहजर शिक्षकांच्या विरोधात पोलिसांत तक्रार
By admin | Published: December 26, 2015 11:59 PM2015-12-26T23:59:54+5:302015-12-27T00:09:41+5:30
सुरगाण्यात गैरहजर शिक्षकांच्या विरोधात पोलिसांत तक्रार
सुरगाणा : तालुक्यातील ठाणगाव शाळेत लेखीपत्र देऊनही शिक्षक शाळेवर हजर न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांसह त्या दोन्ही शिक्षकांविरोधात बाऱ्हे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान, संतप्त पालकांनी शाळेला कुलूपही ठोकले आहे. शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे २३१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पटसंख्येनुसार या शाळेत आठ शिक्षक मंजूर आहेत. मात्र कागदोपत्री सहा तर प्रत्यक्षात चारच शिक्षक अध्यापनाचे कार्य करीत आहेत. इतर वर्गांना शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने गेल्या दोन वर्षांपासून या शाळेस शिक्षक देण्याची मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.
सन २०१३ मध्ये ग्रामस्थ व पालकांनी शिक्षण विभागाकडे लेखी निवेदन देऊन शिक्षक देण्याची मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा ७ जुलै २०१५ रोजी निवेदन देण्यात आले. पंचायत समिती सभापती उत्तम कडू यांना निवेदन देण्यात आले. १७ डिसेंबरपर्यंत प्रतिनियुक्तीवर असलेले शिक्षक ठाणगाव शाळेत हजर न झाल्यास १८ डिसेंबरपासून शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार शाळेला कुलूपही ठोकण्यात आले होते. त्याच्या सहा दिवसानंतरही एक शिक्षक व एक शिक्षिका हजर न झाल्याने ठाणगाव ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी शिक्षक मिळण्यासाठी गटशिक्षण अधिकारी व त्या दोन्ही शिक्षकांविरोधात बाऱ्हे पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याची तक्रार लेखी अर्जाद्वारे केली आहे. (वार्ताहर)