नाशकात सफाई कर्मचा-यांचा छळ, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 04:04 PM2018-03-02T16:04:32+5:302018-03-02T16:04:32+5:30
महापालिका : संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा
नाशिक - महापालिका प्रशासनाने सफाई कामगारांकडून काम करून घेण्याऐवजी नको ते उद्योग करत छळ केला जात असून याबाबत सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वाल्मिकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीने थेट मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
संघर्ष समितीने निवेदनात म्हटले आहे, महापालिका प्रशासन अतिशय अल्प संख्येने असलेल्या सफाई कामगारांकडून नियमबाह्य काम करून घेत आहे. त्यातच प्रशासनाने शासनाच्या धोरणाविरोधात निर्णय घेत ४७८ सफाई कामगारांच्या गैरसोयीच्या बदल्या केल्या आहेत. वरिष्ठांचे आदेशाचे पालन करत कामगार कामावर रुजूही झाले आहेत परंतु, पहाटे ५ वाजता हजेरी लावण्याचे बंधनकारक करण्यात येऊन कामगारांना अपमानास्पद वागणूकही दिली जात आहे. अनेक कामगारांच्या बदल्या त्यांच्या घरापासून लांब अंतरावर करण्यात आलेल्या आहेत. अशा ठिकाणी जाण्यासाठी पहाटे शहर बससेवाही उपलब्ध नाही. प्रशासनानेही त्याबाबत कसलेली नियोजन केलेले नाही. त्यामुळे महिला, ज्येष्ठ कामगारांची परवड होत आहे. त्यातच फिक्स पे वरील कामगारांची तर आर्थिक पिळवणूक होत आहे. सफाई कामगारांना नियम दाखवून त्यांचा छळ केला जात असून त्याबाबत संबंधित अधिका-यांची सखोल चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समितीचे पदाधिकारी सुरेश दलोड, सुरेश मारू, ताराचंद पवार, रमेश मकवाणा व अनिल बेग यांनी केली आहे.
आयुक्तांनाही निवेदन
संघर्ष समितीने आयुक्त तुकाराम मुंढे यांनाही निवेदन देत सफाई कामगारांना होणाºया शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. शुक्रवारी (दि.२) सातपूर येथे आनंदवल्ली भागात सफाई कामगार महिलेची छेड काढल्याचीही तक्रार निवेदनात करण्यात आलेली आहे. प्रशासनाने योग्य नियोजन केले नाही तर काम बंद आंदोलनाबरोबरच मैला फेको आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आला आहे.