दुष्काळी आढावा बैठकीत तक्र ारीचा पाढा
By admin | Published: September 8, 2015 12:06 AM2015-09-08T00:06:04+5:302015-09-08T00:07:23+5:30
येवला : उपाययोजना करण्याचे प्रशासनाला आदेश
येवला : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात आयोजित बैठकीत शेतकर्यांनी आमदार छगन भुजबळ यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. तालुक्यात ९0 टक्के खरीप पिके जळाली असून, जनावरांना चारा नाही तसेच पिण्यासाठी पाणी नाही, टँकर मागूनही वेळेवर मिळत नाही, जनावरे वाचवण्यासाठी किमान चारा-पाणी तरी द्या, अशी आर्त हाक शेतकर्यांनी यावेळी दिली.
बैठकीत ३८ गाव पाणीपुरवठा समितीचे मोहन शेलार यांनी योजनेच्या साठवण तलावात केवळ महिनाभर पुरेल इतकेच पाणी असल्याची माहिती दिली. ३८ गावांसह इतर गावांना पाणी देण्याचे त्यांनी मान्य केले. २२४ गावांतील ४५0 विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहित कराव्यात, अशी सूचना जि.प. सदस्य प्रवीण गायकवाड यांनी मंडली. या योजनेस तत्काळ हिरवा कंदील आमदार भुजबळ यांनी दिला.
नगरसूलच्या १५ वस्त्यांवर केवळ एक टॅँकर पाणी वाटप करीत फिरतो. किमान दोन टॅँकरची आवश्यकता असल्याचे संजय पाटील यांनी सांगितले. पंजाबराव कृषी विद्यापीठ अंतर्गत जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत तालुक्यातील शेतकर्यांचे नऊ कोटींचे थकीत अनुदान गेल्या तीन वर्षांपासून मिळाले नसल्याची तक्रार अँड. माणिकराव शिंदे यांनी केली. यावर सह. निबंधक जितेंद्र शेळके यांनी शासनाकडे गेल्या तीन वर्षापासून अनुदान रखडले असल्याचे सांगितले. फळबाग अनुदानदेखील केवळ १0 टक्के मिळाले असून, ९0 टक्के अनुदान अद्याप मिळाले नसल्याची तक्रार शेतकर्यांनी केली. चोरीचे प्रमाण खूप वाढले आहे. घरात आणि गावात अखंडित वीज देण्याची मागणी वसंत पवार यांनी केली. या बैठकीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी व विविध खात्याचे शासकीय अधिकारी उपस्थित होते. शिवसेनेचे दिलीप मेंगळ यांनी बाळापूर गावासाठी १५ दिवसांपूर्वी टॅँकर मागणी करूनही पाणी अद्याप मिळाले नाही अशी तक्र ार केली. याला मकरंद सोनवणे यांनी दुजोराही दिला. दरम्यान, अँड. माणिकराव शिंदे म्हणाले, सरकार तुमचे आहे. त्यासाठी तुम्ही पुढे व्हा, आंदोलन करा नाहीतर आम्ही १५ सप्टेंबरला रस्त्यावर उतरणार आहोत. या बैठकीस अँड. माणिकराव शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, राधाकिसन सोनवणे, पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, प्रांताधिकारी वासंती माळी, तहसीलदार शरद मंडलिक, मुख्याधिकारी राहुल वाघ, जिल्हा परिषद सदस्य कृष्णराव गुंड, नवनाथ काळे, मकरंद सोनवणे, किशोर सोनवणे, सचिन कळमकर, गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित
होते.
सध्या चालू असलेल्या पालखेडच्या पाणी आवर्तनानंतर धरणात पाणीसाठा नसल्याने पुन्हा पाणी आवर्तन मिळण्याची शक्यता नाही. यामुळे आहे त्या पाण्यात केवळ पिण्यासाठीच पाण्याचा उपयोग करावा. शेतीसाठी पाण्याचा उपसा होणार नाही याची दाखल घ्यावी, येसगाव पाणी योजना पुनर्जीवित करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव तत्काळ पाठवावा. पाणी वाया जाणार नाही यासाठी योजनांची काही दुरु स्ती असल्यास ती करावी. मराठवाडा १४ सप्टेंबरला, तर उत्तर महाराष्ट्र १५ सप्टेंबरला दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य सरकारला कळावे म्हणून रस्त्यावर उतरणार आहे. धरणाच्या भिंतीचे काम नंतर करू किमान मांजरपाड्याचा बोगदा मोकळा करा, यावर मुख्यमंत्र्यांनी होकार दिला असला तरी झारीतील शुक्राचार्य झारीत अडकले तर वेळप्रसंगी आंदोलनही करू, असा इशारा आमदार भुजबळ यांनी
दिला. (वार्ताहर)