रामचंद्र पवारविरुद्ध दोषारोपपत्र दाखल

By admin | Published: January 18, 2017 01:11 AM2017-01-18T01:11:19+5:302017-01-18T01:12:31+5:30

आवाज जुळला : पुराव्यादाखल मेमरी कार्ड सादर

Complaint filed against Ramchandra Pawar | रामचंद्र पवारविरुद्ध दोषारोपपत्र दाखल

रामचंद्र पवारविरुद्ध दोषारोपपत्र दाखल

Next

नाशिक : नांदगाव तालुक्यात शर्तीच्या जमिनींची खरेदी-विक्री करणाऱ्या जमीन-मालकांवर गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांच्याकडे ३५ लाखांच्या लाचेची मागणी केल्याच्या कारणावरून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अखेर तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार व दिलीप पंचसरा या दोघांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दोषारोप पत्रात रामचंद्र पवार यांनी पंचसरा याच्या भ्रमणध्वनीवरून जमीनमालकाशी संपर्क साधून पैशांची मागणी केल्याच्या आवाजाचा पुरावा जोडण्यात आला असून, त्यासाठी भ्रमणध्वनीचे मेमरी कार्डही न्यायालयात सादर करण्यात आले आहे.
६ आॅगस्ट २०१५ रोजी ही घटना घडली होती. पवार यांनी नवीन शर्तीच्या जमिनींचे व्यवहार करणाऱ्या जयंतीभाई पटेल यांच्यावर खोटे प्रतिज्ञापत्र केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे दाखल झाली होती. पवार यांनी दिलीप पंचसरा यांच्या भ्रमणध्वनीवरून संपर्क केल्याची बाबही तपासात उघड झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पवार व पंचसरा या दोघांनाही अटक केली होती. न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देऊन त्यानंतर या दोघांची जामिनावर मुक्तता केली होती. या घटनेला दीड वर्षाचा कालावधी लोटला तरी, आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नव्हते. उलट याच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने तहसीलदारासह २३ जणांविरुद्ध ५ जानेवारी रोजी नवीन गुन्हा दाखल केला असून, त्यात शासनाच्या नजराण्याची रक्कम बुडवून फसवणूक केली व सुमारे पावणे चार कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रामचंद्र पवार यांच्याविरुद्ध लाचेची फिर्याद देणाऱ्या जयंतीभाई पटेल व साक्षीदार शिवाजी सानप यांचाही समावेश आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या या उलटसुलट कारवाईबद्दल संशय व्यक्त केला जात होता. रामचंद्र पवार यांच्या इशाऱ्यावरच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने शासकीय अधिकारी व जमीन मालकांवर गुन्हा दाखल केल्याची उघड चर्चा महसूल खात्यात होऊन या संपूर्ण कारवाईमागच्या ‘हेतू’ची चर्चा झडत आहे. प्रसिद्धीमाध्यमांतून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ९ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने धावतपळत विशेष न्यायालयात रामचंद्र पवार व दिनेश पंचसरा यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यात पवार यांच्या आवाजाच्या नमुन्याचे पुरावे आदि कागदपत्रांचा समावेश आहे.
एकीकडे पुरावा दुसरीकडे गुन्हा
नांदगाव तालुक्यातील नवीन शर्तीच्या जमीन खरेदी-विक्री व्यवहार प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने दाखल केलेल्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्णात सोयिस्कर आपल्या भूमिकेत बदल केला आहे. रामचंद्र पवार व दिनेश पंचसरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करताना जयंतीभाई पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीत कबूल केलेली बाब लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मान्य केली व त्याचाच आधार घेत गुन्हा दाखल केला, एवढेच नव्हे तर दोषारोपपत्रातदेखील त्याचा उल्लेख केला आहे. तर दुसरीकडे जयराम दळवी याच्या तक्रारीवरून शासकीय अधिकारी व जमीन मालकांवर गुन्हा दाखल करताना जयंतीभाई पटेल यांनी कबूल केलेली बाब साफ नाकारण्यात आली आहे. एकाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने घेतलेली परस्परविरोधी भूमिका नुसती संशयास्पदच नव्हे तर या एकूणच कारवाईमागे अनेक ‘अर्थ’ काढू लागली आहे. जयंतीभाई पटेल यांनी नांदगाव तालुक्यात शर्तींच्या जमिनी खरेदी केल्याची कबुली देत या जमिनींचे खरेदीखत, करारनामा सब रजिस्टरकडे नोंदणीकृत झालेले असून, परंतु सदरची जमीन ही नवीन व अविभाज्य शर्तीची आहे. सदर जमीन हस्तांतरणाकरिता नजराण्याची रक्कम शासनास जमा करणे आवश्यक असल्याने त्या रकमा भरण्यास ते तयार असल्याची कबुली प्रतिज्ञापत्राद्वारे दिलेली असल्याची बाब रामचंद्र पवार यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पुरावा म्हणून वापरली, तर दुसरीकडे जयंतीभाई पटेल यांचा कबुली जबाबच त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी वापरला आहे.

Web Title: Complaint filed against Ramchandra Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.