धान्य वाटपात फसवणुकीची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:06 AM2021-05-04T04:06:53+5:302021-05-04T04:06:53+5:30
मालेगाव : शहरातील पिवळ्या शिधापत्रिकाधारकांची स्वस्त धान्य दुकानदार लूट करत आहेत. शासन नियमानुसार त्यांना धान्य मिळत ...
मालेगाव : शहरातील पिवळ्या शिधापत्रिकाधारकांची स्वस्त धान्य दुकानदार लूट करत आहेत. शासन नियमानुसार त्यांना धान्य मिळत नसून, त्यांची फसवणूक करुन शिधापत्रिकाधारकांच्या धान्यावर डल्ला मारला जात आहे. दरमहा वाटप हाेणाऱ्या धान्य वितरणाची चाैकशी करुन अशा रेशन दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार मुफ्ती माेहंमद इस्माईल यांनी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांची भेट घेत निवेदनाद्वारे केली आहे.
शहरात १३० रेशन दुकानांद्वारे धान्य वाटप केले जाते. शहरात १५ हजार अंत्याेदय तर २८ हजार बीपीएल कार्डधारक आहेत. शासनाकडून दरमहा या लाभार्थ्यांसाठी धान्य प्राप्त हाेते. मात्र, त्यांना लाभानुसार धान्य दिले जात नाही. पिवळ्या शिधापत्रिका धारकांना साखरेचे वाटपच हाेत नाही. धान्याची ऑनलाईन पावती दिली जात नाही. अनेक नागरिकांनी याविषयी तक्रारी केल्या आहेत. धान्य दुकानदारांना विचारणा केल्यास ९० टक्के धान्य ऑनलाईन पध्दतीने वितरीत झाल्याचे दाखवले जाते. जनतेची फसवणूक हाेत असल्याचे सबळ पुरावे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण धान्य वाटपाची चाैकशी करुन याेग्य ती कारवाई करावी अन्यथा जनतेच्या मदतीने तीव्र स्वरुपाचे आंदाेलन छेडण्याचा इशारा आमदार मुफ्ती यांनी निवेदनातून दिला आहे.