फेसबुकवरून मुख्यमंत्री शिंदे यांच्या बदनामीचा प्रयत्न, संशयिताविरोधात अदखलपात्र गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 09:06 PM2023-03-20T21:06:01+5:302023-03-20T21:06:12+5:30
सिन्नर-नांदूरशिंगोटेच्या संदीप चंद्रभान शेळके विरोधात तक्रार
सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्हिडिओला ‘५० खोके एकदम ओके’ अशा घोषणा दिल्याचा व्हिडीओ फेसबुकवरून व्हायरल केल्याची तक्रार बाळासाहेबांची शिवसेनाचे तालुकाप्रमुख शरद शिंदे यांनी वावी पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नांदूरशिंगोटे येथील संशयित संदीप चंद्रभान शेळके याच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची (एनसीआर) नोंद करण्यात आली आहे.
शनिवार, १८ मार्च रोजी नांदूरशिंगोटे येथे स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे स्मारक व पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांच्या व्हिडिओला ‘५० खोके एकदम ओके’ अशा घोषणा दिलेल्या नसताना घोषणा दिल्याचा व्हिडीओ संशयित संदीप चंद्रभान शेळके याने टाकून मोबाइलवरील फेसबुक अकाऊंटवरून व तालुक्यातील इतर ग्रुपवर टाकल्याची तक्रार शरद शिंदे यांनी वावी पोलिस ठाण्यात दिली. सदर व्हिडिओचा व कमेंटचा स्क्रीनशॉट काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आपण या कार्यक्रमास प्रत्यक्ष हजर होतो. मात्र अशा कुठल्याही घोषणा देण्यात आल्या नसल्याचे शरद शिंदे यांनी म्हटले आहे. शरद शिंदे यांच्या तक्रारीवरून वावी पोलिसांनी संशयित संदीप शेळके यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची (एनसीआर) नोंद केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय सोनवणे अधिक तपास करीत आहे.