ऑनलाइन परीक्षासंदर्भात १३ हजार विद्यार्थ्यांच्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:15 AM2021-05-11T04:15:44+5:302021-05-11T04:15:44+5:30
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम ते अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या नियमित, रीपिटर व इतर परीक्षांना ऑनलाइन पद्धतीने ...
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम ते अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या नियमित, रीपिटर व इतर परीक्षांना ऑनलाइन पद्धतीने सुरुवात झाली आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षांना देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, याबाबत तब्बल १३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे तक्रारी नोंदविल्या आहे. या तक्रारींची दखल घेत विद्यापीठ प्रशासन तक्रारींची पडताळणी सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता. यात सुधारणा झाली असावी, म्हणून या वर्षी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कमी विद्यार्थी असल्याने, तांत्रिक समस्याही कमी निर्माण झाल्याचे दिसून आले. मात्र, १६ एप्रिलपासून रोज १०० पेक्षा जास्त विषयांची आणि सव्वा लाख ते दीड लाख विद्यार्थी परीक्षा देत असल्याने, त्यांना तांत्रिक अडचणींना सामना करावा लागल्याने, विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये सलग दुसऱ्या वर्षीही गोंधळ उडाल्याचे दिसून आले. अनेक विद्यार्थ्यांनी हेल्पलाइनला संपर्क साधून परीक्षेसाठी लॉगइन होत नाही, अशा तक्रारी केल्या होत्या. मात्र, या विद्यार्थ्यांनी वेळेत परीक्षा न दिल्याने, त्यांची अनुपस्थिती लागलेली आहे. त्यामुळे सध्या तरी हे विद्यार्थी एका विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत, अशीच स्थिती आहे. अनेक विद्यार्थ्यांना लॉगइन करण्यामध्ये अडचणी आल्याने, त्यांना गैरहजर दाखविण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या असून, या संदर्भात जवळपास तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या १३ हजार तक्रारींपैकी तब्बल ९ हजार तक्रारी उपस्थिती संदर्भातीलच असून, चार हजार तक्रारी सोडविलेल्या प्रश्नांपैकी कमी प्रश्न सबमिट झाल्याविषयी आहे. तर उत्तर सेव्ह झाले नाही, कमी गुण पडले, अशा प्रकारच्या तक्रारींचाही यात समावेश असून, विद्यापीठाने विद्यापीठाने वस्तुस्थिती तपासून यावर योग्य पद्धतीने निर्णय घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या तक्रारींची पडताळणी सुरू केली आहे.