शिवशाही बसेसबाबत तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:44 PM2017-11-06T23:44:28+5:302017-11-07T00:20:44+5:30
राज्य परिवहन महामंडळात मागील महिन्यात दाखल झालेल्या शिवशाही बसेसच्या बाबतीत प्रवाशांनी अनेक तक्रारी केल्या असून, या तक्रारींची दखल राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने घेण्यात आली आहे. सदर बसेस सुरू केल्यानंतर प्रवाशांचे अभिप्राय मागविण्यात आले होते. त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारींबाबत जेथे शिवशाही बसेस सुरू आहेत त्या एस.टी.च्या कार्यालयांना कळविण्यात आले असून, प्रवाशांच्या तक्रारी कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे समजते.
नाशिक : राज्य परिवहन महामंडळात मागील महिन्यात दाखल झालेल्या शिवशाही बसेसच्या बाबतीत प्रवाशांनी अनेक तक्रारी केल्या असून, या तक्रारींची दखल राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने घेण्यात आली आहे. सदर बसेस सुरू केल्यानंतर प्रवाशांचे अभिप्राय मागविण्यात आले होते. त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारींबाबत जेथे शिवशाही बसेस सुरू आहेत त्या एस.टी.च्या कार्यालयांना कळविण्यात आले असून, प्रवाशांच्या तक्रारी कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे समजते. तोट्यात चालेल्या महामंडळाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याबरोबरच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी शिवशाही बसेस आणण्यात आल्या. राज्यभरातील अनेक बसस्थानकांना शिवशाही बसेस पुरविण्यात आल्या. नाशिकला उशिराने का होईना १७ बसेस मिळाल्या. यातील काही बसेस या पुणेसाठी, तर काही बसेस कोल्हापूरसाठी सोडण्यात आल्या. पुण्याकडे निघालेली पहिली बस नाशिकरोडमध्येच पंक्चर झाल्याने पहिल्याच दिवशी प्रवासाला खो बसला. या बसने प्रवास करणाºयांना विलंबाने पुणे गाठावे लागल्याची चर्चा आहे. शिवशाही ही अत्यंत लक्झरी प्रकारातील बस असल्याने प्रवाशांना बसचे आकर्षण आहे. इतर बसेसपेक्षा कमी वेळात आणि आरामदायी प्रवास होणार असल्याने प्रवाशांनीदेखील या बसेसचे स्वागत केले होते. मात्र काही दिवसांतच या बसबाबत अनेक तक्रारी नोंदविण्यात आल्याने आरामदायी प्रवासाचा फेरविचार करण्याची नामुष्की महामंडळावर ओढावली. शिवशाही बसेसमध्ये अनेक सुविधांबरोबरच तक्रार नोंदविण्याचीदेखील व्यवस्था आहे. या तक्रारबुकमध्ये सर्वच वयोगटांतील प्रवाशांनी आपले अभिप्राय नोंदविले आहे. यामध्ये बस आरामदायी असली तरी इंजिनचा आवाज मोठा असल्याची प्रमुख तक्रार नोंदविण्यात आली आहे. याबरोबरच वातानुकूलित व्यवस्था आणि स्पीडब्रेकरवरून बस गेल्याचे प्रकर्षाने जाणवत असल्याचे निरीक्षक प्रवाशांनी तक्रारवहीमध्ये नोंदविले आहे. या तक्रारींची वस्तुस्थिती जाणून घेण्याचे पत्र मुख्य कार्यालयाने विभागीय कार्यालयाला पाठविल्याचे वृत्त आहे. नाशिकमध्ये दाखल झालेल्या १७ बसेसपैकी चार बसेस या नागपूरला पळविण्यात आल्यामुळे महामंडळावर मोठी टीका झाली होती. आता नाशिकला १३ शिवशाही बसेस असून, येत्या काही दिवसांत पुन्हा नाशिकला बसेस मिळणार आहेत.
आणखी बसेस दाखल होणार
नाशिक एसटी महामंडळाच्या ताफ्यात १७ शिवशाही बसेस दाखल झाल्या होत्या. त्यापैकी चार बसेस नागपूरला देण्यात आल्या. आता आणखी बसेस मिळण्याची शक्यता आहे. शिवशाही ही वातानुकूलित ४७ आसनी बस असून त्यामध्ये लॅपटॉप, मोबाइल चार्जिंगची सोय आहे. तसेच एलइडी स्क्रीन, वायफाय अशा अत्याधुनिक सुविधा या बसमध्ये आहेत. राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये या बसेस सुरू झाल्या आहेत, तर एकूण १५०० शिवशाही बसेस या वर्षाअखेरपर्यंत राज्याच्या एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.