मनसेतील गटबाजीच्या अमित ठाकरे यांच्याकडे तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:12 AM2021-07-18T04:12:03+5:302021-07-18T04:12:03+5:30
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीसाठी मनसेचे नेते अमित ठाकरे, आमदार राजू पाटील आणि संदीप देशपांडे यांनी राजगडावर पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या ...
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीसाठी मनसेचे नेते अमित ठाकरे, आमदार राजू पाटील आणि संदीप देशपांडे यांनी राजगडावर पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी पक्षातील बेदिली अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर मांडली. पक्षात दोन नेत्यांचे दोन गट पडले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. राज्यात महाविकास आघाडी आणि नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने चुकीच्या निर्णयांच्या विरोधात रान पेटवून आंदाेलन करता येऊ शकतात. मात्र, गेल्या वर्षी महापौरांना च्यवनप्राश आणि बसगाड्यांवर संभाजी नगर असे स्टिकर चिकटवण्याचे आंदाेलन झाल्यानंतर आंदोलनबंदी करण्यात आली आहे. पक्षातील कार्यक्रमांना काही नेत्यांना डावलले जाते, अशाप्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या. पक्षासाठी तटस्थ नेता देखील नियुक्त करावा, जेणे करून कार्यकर्त्यांना आपली भूमिका मांडता येईल, असे मत तक्रारकर्त्यांनी व्यक्त केल्याचे समजते.
पक्षातील गटबाजीला संदीप देशपांडे यांनी नाकारले नाही. मात्र, पक्षात कुरबुरी चालूच असतात. जे झाले ते मागे सोडून नव्या जोमाने आता महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.