नाशिक- शिर्डी महामार्गालगतच्या जमिनी अधिग्रहित होत असल्याच्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:09 AM2021-03-29T04:09:02+5:302021-03-29T04:09:02+5:30
नाशिक- शिर्डी महामार्ग क्र. १६० चे सध्या वेगाने रुंदीकरण चालू आहे. या रुंदीकरणासाठी महामार्गालगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या ...
नाशिक- शिर्डी महामार्ग क्र. १६० चे सध्या वेगाने रुंदीकरण चालू आहे. या रुंदीकरणासाठी महामार्गालगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी राजमार्ग प्राधिकरणाने संपादित केलेल्या क्षेत्रात खूण, दगड रोवले होते. महामार्गालगत संरक्षक भिंत बांधण्याचे काम चालू आहे. हे बांधकाम पहिल्या जागेत होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या महामार्गाचे अतिरिक्त भूसंपादन होत असल्याचे अनेक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. येथील अरुण संतुजी हांडे यांच्या चिकूबागेतील तीन चिकू झाडे राष्ट्रीय नाशिक- शिर्डी महामार्गाच्या रुंदीकरणात अगोदर गेल्यानंतरही नव्याने तीन चिकूची झाडे रुंदीकरणात जात आहे. झाडांचा व अतिरिक्त अधिग्रहण होत असलेल्या जागेचा मोबदला मिळण्याची मागणी हांडे यांनी केली आहे. तसेच लीलाबाई विनायकराव चिने यांच्या मालकीच्या हॉटेल परिसरातील एक छोटी खोली, झाड, बांधकाम हे अतिरिक्त संपादित करण्यात येत आहे. जवळपास दोन गुंठे जामीनही यात संपादित होत असल्याचे दिसत आहे. मात्र, या झाडांचा व अतिरिक्त जागा जात असल्याचा मोबदला मिळत नसल्याची तक्रार लेखी व तोंडी स्वरूपात शेतकऱ्यांनी केली आहे. अशा प्रकारे अनेक शेतकऱ्यांचे झाडे, फळझाडे, जमीन या महामार्गात अतिरिक्त संपादित होत आहे. परंतु, संबंधित अधिकारी कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही तसेच शहानिशा करीत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.