सेवानिवृत्तांचा तक्रारींचा पाढा
By admin | Published: December 9, 2015 11:30 PM2015-12-09T23:30:37+5:302015-12-09T23:31:42+5:30
मेळावा : विविध समस्यांवर झाली चर्चा
नाशिक : जिल्हा कोषागार कार्यालयाने आयोजित केलेल्या सेवानिवृत्तांच्या मेळाव्यातपेन्शन मिळण्यास येणाऱ्या अडचणी, बॅँकांमध्ये लावाव्या लागणाऱ्या रांगा, तेथे मिळणारी वागणूक अशा विविध तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. सेवानिवृत्तांना व्यवहार करण्यासाठी एटीएम देण्याची केली जाणारी मागणी मात्र फेटाळून लावण्यात आली.
कोषागार खात्याचे विभागीय सहसंचालक बाळासाहेब घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यात प्रामुख्याने सेवानिवृत्तांनी दरमहिन्याला बॅँकेत जाऊन पैसे काढण्याऐवजी त्यांना एटीएम दिल्यास मोठा त्रास कमी होणार असल्याचे सांगून मागणी केली. बॅँकांमध्ये सेवानिवृत्तांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसते, वृद्ध सेवानिवृत्तांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. या साऱ्या गोष्टींची दखल घेऊन बॅँकांनी किमान सेवानिवृत्तांसाठी तरी स्वतंत्र खिडकी उघडावी आदि मागण्या करण्यात आल्या. राज्याच्या वित्त विभागानेच सेवानिवृत्तांना एटीएम न देण्याचा निर्णय घेतल्याची बाब पटवून देण्यात आली, त्यामागे सेवानिवृत्तांचाच लाभ असल्याचेही अधिकाऱ्यांनी पटवून दिले. काही सेवानिवृत्तांना वयोमानामुळे दिसत नाही, तर काहींच्या एटीएमचा दुरुपयोग होण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगण्यात आले. या मेळाव्यास सहकोषागार अधिकारी संतोष जाधव, सहायक लेखानिधकारी मानसी पाटील, स्टेट बॅँकेचे लक्ष्मण गायकवाड, सेवानिवृत्त संघटनेचे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, माधवराव भणगे, अनिता अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येने सेवानिवृत्त सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)