अखेरच्या पर्वणीची ‘औपचारिकता’ पूर्ण
By admin | Published: September 18, 2015 11:14 PM2015-09-18T23:14:01+5:302015-09-18T23:20:26+5:30
ताणतणावातून मुक्तता : यंत्रणेने सोडला सुटकेचा नि:श्वास
नाशिक : गेल्या कुंभमेळ्यातील दुर्घटना, त्यामुळे यंदा केलेले अतिरेकी निर्बंधाचे नियोजन, त्यावर झालेली टीका, पुन्हा बदललेले नियोजन अशा सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या कुंभमेळ्यातील तिसरी पर्वणीही निर्विघ्न पार पडली. फारशी बंधने नसल्याने भाविकांचा मुक्त वावर, तसेच पावसामुळे काहीसा व्यत्यय येऊनही अखेरची पर्वणी शांततेत पार पडली आणि सर्व शासकीय यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
कुंभमेळ्यात लाखो भाविक येतात,परंतु त्यांची संख्या किती याचे मोजमाप बारा वर्षांपूर्वीही यंत्रणेला शक्य झाले नाही आणि यंदाही शक्य झालेले नाही. मात्र, किमान एक कोटी भाविक येतील याचे दडपण घेऊनच यंत्रणा वावरली. गेल्या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे यंदा येणाऱ्या लक्षावधी भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन कसे करावे, हे आव्हानात्मक असल्याचे शासकीय यंत्रणेचे म्हणणे होते. त्यामुळे अति निर्बंध घातल्याचा फटका पहिल्या पर्वणीला बसला आणि स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास झाल्याने यंत्रणेवर टीका झाली. नियोजन योग्यच होते असा दावा करत यंत्रणेला विशेषत: पोलिसांना फेरनियोजन करून अतिरेकी नियोजनाची चूक मान्यच करावी लागली. दुसऱ्या पर्वणीसाठी केलेला फेरबदल अर्थातच निर्बंध कमी करून स्थानिक आणि बाहेरून आलेल्या भाविकांची पायपीट कमी केल्यामुळे भाविक स्नानाचा आनंद घेऊ शकले. दुसऱ्या पर्वणीच्या तुलनेत तिसऱ्या पर्वणीला गर्दी कमी होईल असा अंदाज अगोदरच आला होता. शुक्रवारी मोटारी, बस आणि रेल्वेने येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाल्याने तसा अंदाज बांधला गेला. त्यातच गणेश प्रतिष्ठापनेमुळेदेखील गुरुवारी निर्बंध शिथिल होते. त्यातच मध्यरात्री आलेल्या मुसळधार पावसाने पोलिसांचे काम आणखी सोपे केले. सकाळी साधू-महंतांचे किरकोळ नाराजीनाट्य वगळता मिरवणूक, शाहीस्नान सुरळीत पार पडले आणि त्यानंतर भाविकांचे स्नानही निर्विघ्नपणे पार पडले. आणि यंदाच्या कुंभमेळ्यातील तिसऱ्या पर्वणीची औपचारिकता पार पडली. कुंभमेळा सुरळीत पार पडल्याने शासकीय यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आता केवळ त्र्यंबकेश्वर येथे २५ सप्टेंबर रोजी होणारी अखेरची पर्वणी बाकी असून ती पार पडताच यंत्रणा तणावातून मुक्त होईल.