जलयुक्तची कामे फेब्रुवारीअखेर पूर्ण करा
By admin | Published: December 24, 2015 12:21 AM2015-12-24T00:21:52+5:302015-12-24T00:22:26+5:30
आढावा बैठक : आयुक्तांच्या सूचना
नाशिक : जलयुक्त शिवार योजनेची सर्व कामे फेब्रुवारी अखेरपर्यंत झाली पाहिजेत, तसेच महसुली वसुलीचे दिलेले २०८ कोटींचे उद्दिष्ट तीन महिन्यांत पूर्ण करा,असे आदेश विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
बुधवारी (दि. २३) आयुक्त एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्णात जेथे जेथे टंचाई सदृश परिस्थिती असेल तेथे तत्काळ पाणीपुरवठ्याची सोय करण्यात यावी. जलयुक्त शिवाराची कामे त्यासाठीच फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करावीत, जेणेकरून टंचाईच्या समस्येला या गावांना तोंड द्यावे लागणार नाही. तसेच सद्यस्थितीत पाण्याची आवर्तने वेगवेगळ्या धरणातून सोडली जात आहेत. ती आवर्तने शेवटच्या टोकाला असलेल्या गावांपर्यत पोहोचली पाहिजेत. मध्येच कोणी पाटचारीमधून पाणी चोरणार नाही, याची दक्षता घ्यावी,असे आदेशही यांनी यंत्रणेला दिले. तसेच महसूल विभागाला चालू आर्थिक वर्षात २०८ कोटींचा महसूल वसूल करण्याचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत केवळ ९७ कोटींचाच महसूल गोळा झाला आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत उर्वरित १११ कोटींचा महसूल वसूल करावा, अशा सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीस जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्यासह सर्वच अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)