देवळाली रेल्वेस्थानकाजवळ गर्डर बसविण्याचे काम पूर्ण
By admin | Published: July 18, 2016 12:11 AM2016-07-18T00:11:51+5:302016-07-18T00:33:28+5:30
देवळाली रेल्वेस्थानकाजवळ गर्डर बसविण्याचे काम पूर्ण
देवळाली कॅम्प : येथील रेल्वेस्थानकाजवळ लालपुलावरील डाउन लाइनवरील गर्डर बसविण्याचे काम शनिवारी पूर्ण करण्यात आले. परंतु त्यामुळे रेल्वेला मेगाब्लॉक घ्यावा लागल्याने या स्थानकावरून सकाळी दहा ते दीड वाजेदरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक बंद होती.
देवळाली रेल्वेस्थानकाकडून नाशिकरोडकडे जाणाण्या डाउन लुप मार्गाखाली असणारा हा गर्डर ब्रिटिश काळापासून बदलण्यात आला नव्हता, त्यामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये या उद्देशाने मध्य रेल्वे प्रशासनाने महिनाभरापूर्वी जुना गर्डर हटविला. या ठिकाणी नवीन गर्डर बसविण्याचे काम शनिवारी सुमारे साडेतीन तास चालू होते. यामुळे मध्य रेल्वेचा वीजपुरवठा या ठिकाणी खंडित करण्यात आला होता. हे काम करत असताना कुठलाही अपघात होऊ नये म्हणून मध्य रेल्वेच्या या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. हे काम रेल्वे प्रशासनाचे अपर मंडल रेल्वे प्रबंधक अरुण धार्मिक, वरिष्ठ मंडल अभियंता समन्वय ए. के. सिंग, उपमुख्य अभियंता राज कुमार, वरिष्ठ मंडल विद्युत अभियंता अजय टेकाडे, वरिष्ठ मंडल यांत्रिक अभियंता दिनेश गजभिये, मंडळ अभियंता आर. पी. चव्हाण, सहायक मंडल अभियंता अतुल देशपांडे, वरिष्ठ विभाग इंजिनिअर एस. के. मालविया, के. सी. वर्मा, सी. बी. खैरे, स्टेशन प्रबंधक आर. एस. बागुल आदिंच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. (वार्ताहर)