जमीन अधिग्रहणाची तयारी पूर्ण
By admin | Published: January 4, 2015 01:21 AM2015-01-04T01:21:59+5:302015-01-04T01:22:21+5:30
जमीन अधिग्रहणाची तयारी पूर्ण
नाशिक : तपोवनात साकारण्यात येणाऱ्या साधुग्रामसाठी जागा अधिग्रहणाचा एक प्रयत्न फसल्यानंतर आता प्रशासनाने पुन्हा नव्या जोमाने जमीन अधिग्रहणाची तयारी पूर्ण केली असून, शनिवारी तहसीलदार गणेश राठोड यांनी तपोवनात भेट देऊन स्थळ निरीक्षण पूर्ण करीत, शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू केली आहे. जिल्हा प्रशासनाने साधुग्रामसाठी राबविलेली सर्व प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशाने रद्दबातल ठरल्यानंतर आता प्रशासनाने जमीन अधिग्रहणाची सारी प्रक्रिया कायद्याच्या चाकोरीतच पूर्ण करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी साधुग्राम व वाहनतळासाठी जमीन अधिग्रहणासाठी शासनाच्या निर्देशानुसार तहसीलदारांनाच अधिकार देऊन नाशिक, त्र्यंबकेश्वर, सिन्नर व इगतपुरी चार तहसीलदारांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्तीही देण्यात आली. न्यायालयाने यापूर्वीची जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया बेकायदेशीर ठरवितानाच या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात २८ जागामालकांनी दाखल केलेल्या याचिकाही निकाली काढल्यामुळे आता कायदेशीर कोणतेही बंधन नसल्याचे पाहून शनिवारी साधुग्रामच्या जागेसाठी प्राधिकृत केलेले तहसीलदार गणेश राठोड यांनी मंडळ अधिकारी, तलाठ्यांसमवेत अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या जागेवर जाऊन स्थळनिरीक्षण केले. त्यानंतर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात येणार आहे, त्यांना जमीन महसूल अधिनियमान्वये नोटिसा बजावण्याच्या कामालाही गती देण्यात आली असून, रविवारी ही सारी प्रक्रिया पूर्ण होण्याचे संकेत आहे. (प्रतिनिधी)