निलंबित तहसीलदारांचे जबाब पूर्ण
By admin | Published: May 27, 2015 11:51 PM2015-05-27T23:51:37+5:302015-05-28T00:07:44+5:30
सुरगाणा घोटाळा : गुरुवारी कागदपत्रांची तपासणी
नाशिक : सुरगाणा येथील शासकीय धान्य घोटाळा प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने निलंबित तहसीलदारांसह अन्य कर्मचाऱ्यांचे जाबजबाब नोंदवून घेण्याची कार्यवाही पूर्ण केली असून, ही चौकशी धान्य घोटाळ्यात प्रत्येकाची जबाबदारी व त्याने पार पाडलेले कर्तव्य इतपतच प्राथमिक पातळीवर मर्यादित ठेवण्यात आली. गुरुवारी मात्र यासंदर्भातील दप्तराची तपासणी केली जाणार आहे.
विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या या समितीच्या अन्य सदस्यांनीही नाशिकला हजेरी लावून अगोदर चौकशीची रूपरेषा ठरवून ज्यांच्यावर विधीमंडळ अधिवेशनात ठपका ठेवण्यात आला त्या सर्वांना नोटीस बजावून समितीसमोर हजर राहण्याच्या सूचना केल्या होत्या. मंगळवारी जिल्हा पुरवठा अधिकारी, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, लेखा कर्मचारी व सातही तहसीलदार समितीसमोर हजर झाले होते. त्यात समितीने प्रत्येकाला स्वतंत्रपणे बोलावून ते करीत असलेले काम, त्यांची जबाबदारी व सुरगाणा धान्य घोटाळ्याशी त्यांचा असलेला संबंध तपासून पाहिला. काही मोजकेच प्रश्न विचारून या घोटाळ्यात संबंधित किती सहभागी आहेत, हे समितीने वैयक्तिकरीत्या तपासून पाहताना समितीसमोर हजर झालेल्यांकडून दिली गेलेली माहितीच त्यांचा जबाब म्हणून ग्राह्ण धरला. अशा प्रकारे चौकशी करताना दुसऱ्याकडे बोट दाखविण्यासही समिती सदस्यांनी नकार दिल्यामुळे प्रत्येकाने फक्त आपल्यापुरतीच माहिती समितीपुढे दिली. बुधवारी समितीचे सदस्य पुन्हा मुंबईकडे रवाना झाले असून, गुरुवारी जिल्हा पुरवठा खात्याने तालुक्यांशी केलेला पत्र व्यवहार, धान्याचे नियतन, वाहतूकदाराकडून झालेली वाहतूक, प्रत्येक तालुक्याला मिळालेला कोटा व गुदाम तपासणीचा अहवाल अशा बाबींची तपासणी केली जाणार आहे.