मालेगावच्या पूर्वभागात संमिश्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 04:09 PM2020-03-22T16:09:03+5:302020-03-22T16:11:03+5:30
मालेगाव मध्य : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाळण्यात आलेला जनता कर्फ्युला रस्त्यावरील तुरळक गर्दीचा अपवाद वगळता पूर्व भागात सर्व बाजारपेठा, हॉटेल, पानदुकाने पूर्णत: बंद ठेवत उत्स्फुर्त पाठींबा दिला.
पोलीस व मनपा अधिकारी पथकाने शहरातील विविध भागात गस्त करीत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणुच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आज जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. पंतप्रधानांच्या आवाहनाला शहराच्या पूर्व भागातील मुस्लिम बांधवांनीही प्रतिसाद देत व्यवहार बंद ठेवण्यात आले. सकाळी सातपासूनच अहोरात्र वर्दळीने ठिकाण म्हणून ओळखले जाणारे अमन चौक, मुशावरत चौक, इस्लामपुरा भागातील चटोरी गल्लीसह आझादनगर, गांधी कापड बाजार, नुमानीनगर, मच्छीबाजार, महात्मा फुले भाजी मंडई अशी दैनंदिन भाजीपाला बाजार पूर्णपणे बंद असल्याने या भागांमध्ये शुकशुकाट दिसून आला. काही ज्येष्ठ नागरिक व तरुण गल्लीबोळाच्या कोपऱ्यावर व चौकाचौकातील बंद दुकानांच्या ओट्यावर बसलेले आढळून येत होते. पोलीस दलाचे पथके व मनपाच्या अधिकाऱ्यांनी शहराच्या विविध भागात गस्त घालुन पाहणी करीत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात आले. याबंदमध्ये काही औषधी दुकाने मात्र सुरू होती.