बँकांमध्ये संमिश्र स्थिती
By Admin | Published: December 31, 2016 12:04 AM2016-12-31T00:04:58+5:302016-12-31T00:05:13+5:30
रांगा संपल्या : कॅशलेस पर्यायांचा अभाव; बँकांची असमर्थता
नाशिक : केंद्र सरकाने ८ नोव्हेंबर रोजी एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर ५० दिवस उलटूनही परिस्थिती संपूर्णपणे सुधारली नसून अद्यापही शहरातील प्रमुख बँकांमध्ये गर्दी दिसून येत आहे, तर काही बँकांमध्ये मात्र शुकशुकाट आहे. एटीएमसमोरच्या रांगाही संपल्या असल्या तरी अद्याप शहरातील बहुतांश एटीएममध्ये पैसे मिळत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, शहरातील सर्व एटीएम सुरू करण्याची मागणी होत आहे.
विमुद्रीकरण प्रक्रियेत जुन्या नोटा जमा करण्याच्या शेवटच्या दिवशी ज्यांना गेल्या ५० दिवसांच्या कालावीत नोटा जमा करता आल्या नाहीत त्यांनी शुक्रवारी आपल्याकडे असलेली शेवटची हजार तथा पाचशेची नोटही बँकेत जमा केली. त्यामुळे दैनंदिन व्यवहार करणाऱ्यांसोबतच थोड्याफार प्रमाणात जुन्या नोटा जमा करणाऱ्यांचीही बँकांमध्ये वर्दळ दिसून आली. बँकांमध्ये असलेल्या गर्दी पैकी अनेकजण पैसे काढण्यासाठी अथवा चेक वटविण्यासाठीच रांगेत उभे असल्याचे दिसले. भरणा करणाऱ्यांची संख्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले. विविध बँकांचे चेक सर्व्हर डाउन अथवा इंटरनेटसारख्या तांत्रिक अडचणींमुळे रखडले आहेत, तर सहकारी बँकांमध्ये अद्यापही पुरेसे चलन पोहोचले नसल्याने अशा बँकांमध्ये व्यवहार अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमध्येही गर्दी विरळ प्रमाणात असली तरी यात बहुतांश ग्राहक पैसे काढणारेच असल्याने बँकांसमोर चलन पुरवठ्याचा प्रश्न कायम आहे. बँकांमध्ये होणारा भरणा ग्राहकांच्या तुलनेत अपुरा असल्याने बँकाकडून रिझर्व्ह बँकेकडे आणखी रकमेची मागणी सुरू आहे. (प्रतिनिधी)