शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद
By Admin | Published: June 6, 2017 03:33 AM2017-06-06T03:33:01+5:302017-06-06T03:33:11+5:30
नाशिक : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, शेतीमालाला हमीभाव या प्रमुख मागण्यांसह इतरही मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.५) पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, शेतीमालाला हमीभाव या प्रमुख मागण्यांसह इतरही मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.५) पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला नाशिकमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही शेतकरी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मेनरोड परिसरात दुकाने बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर दुकाने बंद झाली. परंतु पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने काही व्यावसायिकांनी पुन्हा दुकाने उघडली. यावेळी शेतकऱ्यांनी सत्ताधारी भाजपासह राज्यात व केंद्रात सत्तेत सहभागी शिवसेनेविरोधातही घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला.
शेतकरी संपात फूट पडल्याच्या चर्चेनंतर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत पूर्वनियोजित राज्यव्यापी बंद अधिक प्रभावीपणे करण्याचा निर्णय झाला. परंतु, आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी पुढे आलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख शहर नाशिकमध्येच वेगवेगळ्या भागात संपाला संपूर्ण प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले.
शहरातील व्यावसायिकांनी सकाळपासूनच नियमित त्यांची दुकाने उघडली. परंतु, शेतकऱ्यांचा संपा दरम्यान सरकारच्या सूचनांनुसार विविध मोबाइल कंपन्यांनी इंटरनेट बंद केल्याने आंदोलकांमधील संपर्क कमी झाला. शहर परिसरातील ग्रामीण भागात आंदोलन सांभाळतांना शेतकऱ्यांनी शहराकडे लक्षच दिले नाही.