शेतकरी संपाला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:30 AM2018-06-02T01:30:49+5:302018-06-02T01:30:49+5:30
सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रीय किसान मजदूर महासंघातर्फे पुकारण्यात आलेल्या संपाला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सायखेडा येथे आंदोलनादरम्यान तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर सिन्नर-शिर्डी महार्गावर तसेच सायखेड्यात शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला.
नाशिक : सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रीय किसान मजदूर महासंघातर्फे पुकारण्यात आलेल्या संपाला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सायखेडा येथे आंदोलनादरम्यान तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर सिन्नर-शिर्डी महार्गावर तसेच सायखेड्यात शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला. लासलगाव येथे लिलाव सुरळीत सुरू असले तरी संप असल्याने आवक घटली आहे. आतापर्यंत केवळ कांद्याचे आठ ट्रॅक्टर लिलावासाठी आले असून, सरासरी भाव ४०० ते ९५० पर्यंत होते. दिंडोरीतही शेतकरी संप नसला तरी शेतमालाची आवक कमी झाली आहे. पेठमधून मोठ्या प्रमाणात विक्रीस येणाºया आंब्याची आवक आज अत्यंत कमी झाली तर दररोजचा बाजारही सुरळीत सुरू होता. दिंडोरी बाजार समितीत केवळ तीन पिकअप व तीन ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली. वणी उपबाजारातही शेतकरी फिरकले नाहीत, त्यामुळे सर्वत्र शुकशुकाटच होता. पिंपळगाव बाजार समितीमध्ये केवळ पाच वाहने लिलावासाठी आली. देवळा तालुक्यातील खामखेडा येथील शेतकºयांनी रस्त्यावर टमाटे व कांदे फेकून सरकारचा निषेध व्यक्त करत शेतकरी संपाला पाठिंबा दिला.
गोदाकाठ भागात कडकडीत संप
सायखेडा : गोदाकाठ भागातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेले असून, सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी सायखेडा चौफुली येथे रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध व्यक्त केला. खबरदारी म्हणून सायखेडा पोलिसांनी तीन आंदोलन कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले आहे. परिसरातील प्रत्येक गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मागील वर्षी शेतकरी आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या गोदाकाठ भागातील ४२ गावांत यंदादेखील शेतकºयांनी कडकडीत बंद पाळला आहे. विशेष म्हणजे सर्व शेतकºयांनी संपात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला असून, एकही शेतकºयाने शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणला नाही. दूध उत्पादक शेतकºयांनी आपले दूध घरीच ठेवले मात्र दूध संकलन केंद्रात आणले नाही त्यामुळे परिसरातील सर्व गावातील दूध संकलन केंद्र बंद पडली होती. शेतमालाला व दुधाला हमीभाव मिळावा, कर्जमाफीतील त्रुटी दूर करून उर्वरित शेतकºयांना कर्जमाफी मिळावी, वयोवृद्ध शेतकºयांना पेन्शन योजना सुरू करावी, खते आणि औषधांच्या निर्धारित किमती कमी करून शेतीसाठी येणारा खर्च कमी करावा, शेतकºयांना मिळणाºया कर्जतील अटी व शर्ती कमी करून कर्ज योजना सुलभ करावी, अशा विविध प्रकारच्या मागण्यांसाठी देशातील शेतकरी संपावर गेला आहे. सायखेडा परिसरात गोदावरी नदीचे खोरे असल्याने उन्हाळ्यात मुबलक पाणी, काळी कसदार जमीन यामुळे उन्हाळ्यात नगदी पिके घेतली जातात, परिसरात भाजीपाला, गाजर, मिरची, पिकांचे उत्पादन जास्त प्रमाणात आहे. शेतमाल तोडणी करण्याचे काम सुुरू आहे. शेतकºयांना चार पैसे मिळण्याची वेळ असूनसुद्धा आपल्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी शेतकºयांनी आपल्या उत्पादनावर पाणी सोडून स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला आहे. शेतमाल शेतकºयांनी शेतातून काढला नाही त्यामुळे बाजार समितीत माल विक्र ीसाठी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे रस्ते ओस पडले आहे तर बाजार समितीत शांतता पसरली आहे. खबरदारी म्हणून सायखेडा पोलिसांनी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिसरातील शेतकरी नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर पोलिसांनी दिवसभर करडी नजर ठेवली होती.