संमेलनकाळासाठी सर्वसमावेशक समिती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:13 AM2021-02-08T04:13:09+5:302021-02-08T04:13:09+5:30
नाशिक : मार्च महिन्यात नाशिकला होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील प्रशासकीय कामांची व्याप्ती तसेच त्यामध्ये विविध शासकीय ...
नाशिक : मार्च महिन्यात नाशिकला होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील प्रशासकीय कामांची व्याप्ती तसेच त्यामध्ये विविध शासकीय विभागांची प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी विचारात घेता सर्व विभागांमध्ये योग्य समन्वय राखण्याच्या दृष्टीने एक सर्वसमावेशक समन्वय समिती स्थापित करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे हे या सर्वसमावेशक समितीचे मुख्य समन्वयक राहणार आहेत.
संमेलनासाठीच्या या समितीत सदस्य म्हणून महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, सहायक कामगार आयुक्त एस.टी. शिर्के, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, कार्यकारी अभियंता नाशिक शहर धनंजय दीक्षित, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत, नाशिक शहराचे सहायक पोलीस आयुक्त नवलनाथ तांबे, अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मंडळाकडून एका महिला सदस्यासह दोन सदस्य राहणार आहेत. संमेलनाच्या आयोजकांकडून वेळावेळी प्राप्त होणाऱ्या अनुज्ञेय बाबींच्या पूर्ततेच्या संदर्भात संबंधित शासकीय विभागांशी समन्वय ठेवून त्यांच्याकडून पूर्तता करून घेतील. ही समिती सर्वसमावेशक असल्याने ही एकच समिती संपूर्ण अधिवेशनकाळात समन्वयाचे संपूर्ण काम करेल, असेही या आदेशात पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी नमूद केले आहे.
--इन्फो---
संमेलनासाठी काम करणारे अधिकारी
साहित्य संमेलनाला राज्यासह देशभरातून रसिक येणार असल्याने संमेलनाच्या माध्यमातून एकप्रकारे नाशिकचीच छबी सर्वदूर जाणार आहे. त्यामुळे संमेलनाच्या समन्वय समितीत प्रत्येक विभागातील काम करणारे अधिकारी हवेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी मागील महिन्यात संमेलनासाठीच्या पहिल्याच बैठकीत दिले होते. त्यामुळे संबंधित विभागांकडून पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसारच अधिकारी दिले असतील तर समन्वय समिती आयोजनात प्रभावी भूमिका बजावू शकेल.