बदलत्या अभ्यासक्रमाची  सर्वांगीण ओळख व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 01:05 AM2018-06-25T01:05:03+5:302018-06-25T01:05:20+5:30

विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाचा दहावीतील परीक्षेपुरता विचार करू नये, तर जिज्ञासा वाढवून भविष्यातदेखील या अभ्यासाचा आणि ज्ञानाचा कसा फायदा होईल याचा विचार करावा, त्यामुळे विद्यार्थी न बनता ज्ञानार्थी बना, असा सल्ला मान्यवर शिक्षणतज्ज्ञांनी मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने आयोजित मार्गदर्शन कार्यशाळेत दिला.

 A comprehensive introduction to the changing curriculum | बदलत्या अभ्यासक्रमाची  सर्वांगीण ओळख व्हावी

बदलत्या अभ्यासक्रमाची  सर्वांगीण ओळख व्हावी

googlenewsNext

नाशिक : विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाचा दहावीतील परीक्षेपुरता विचार करू नये, तर जिज्ञासा वाढवून भविष्यातदेखील या अभ्यासाचा आणि ज्ञानाचा कसा फायदा होईल याचा विचार करावा, त्यामुळे विद्यार्थी न बनता ज्ञानार्थी बना, असा सल्ला मान्यवर शिक्षणतज्ज्ञांनी मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने आयोजित मार्गदर्शन कार्यशाळेत दिला. लवाटेनगर येथील लक्षिका मंगल कार्यालयात मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने दहावीचा बदलणारा अभ्यासक्रम आणि बदलणारी मूल्यमापन पद्धती या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाचे सदस्य असणारे डॉ. स्नेहा जोशी, प्रा. डॉ. अ. ल. देशमुख, प्रा. डॉ. शिवानी लिमये, प्रा. माधव भुसकुटे, प्रा. डॉ. श्रृती चौधरी आदींनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दहावीच्या वर्गामध्ये सर्व विषयांसंदर्भात शिकवण्याची पद्धत, अभ्यास करण्याची पद्धत, मूल्यमापन पद्धती, गट अभ्यास सहली, विज्ञान प्रयोग प्रात्यक्षिके अशा विविध अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.  याप्रसंगी डॉ. स्नेहा जोशी यांनी दहावीच्या अभ्यासक्रमातील मराठी विषयाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. जोशी यांनी मूल्यमापन आराखडा पुस्तकाचा अभ्यास आवश्यक असल्याचे सांगून भाषा समृद्ध करण्याचे आवाहन केले. तसेच पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होऊ द्यावे, त्यांना विचार करण्याची संधी द्यावी, असेही स्पष्ट केले.  याप्रसंगी प्रा. डॉ. शिवानी लिमये यांनी इतिहास, राज्यशास्त्र विषय हे इंग्रजी, गणित आणि विज्ञानाइतकेच महत्त्वाचे असल्याचे सांगून इतिहासातील अभ्यासक्रमाचे बारकावे स्पष्ट केले.  प्रमुख पाहुणे विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर व वृंदा लवाटे यांनीही मनोगत व्यक्त केले.  याप्रसंगी डॉ. धनंजय अहिरे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना जीवनातील दहावी परीक्षेचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन तृप्ती बक्षी यांनी केले. प्रास्ताविक अजित टक्के यांनी केले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच दहावी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धतीविषयी आयोजित केलेल्या या कार्यशाळेला विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात रचना व नवरचना विद्यालय, आदर्श शाळा, आनंद निकेतन शाळा तसेच जिल्हा परिषद व महापालिका शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच अनेक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकही उपस्थित होते.

Web Title:  A comprehensive introduction to the changing curriculum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.