संगणक साक्षर कार्यकर्त्यांचा वाढला भाव

By admin | Published: October 9, 2014 02:01 AM2014-10-09T02:01:14+5:302014-10-09T02:01:59+5:30

संगणक साक्षर कार्यकर्त्यांचा वाढला भाव

Computer literate workers increased prices | संगणक साक्षर कार्यकर्त्यांचा वाढला भाव

संगणक साक्षर कार्यकर्त्यांचा वाढला भाव

Next

 

नाशिक : निवडणुकीत पदरी कार्यकर्त्यांची फौज नसेल, तर उमेदवार एकटा काही करू शकत नाही. पूर्वी पक्षासाठी झोकून देऊन काम करणारी ‘कार्यकर्ता’ ही संकल्पना आजच्या व्यावहारिक जगात मागे पडली आहे. उमेदवाराला कार्यकर्ता जसा भारवाही लागतो त्याचबरोबर सुनियोजनासाठी बौद्धिकदृष्ट्या काही सक्षम कार्यकर्त्यांचीही गरज भासते. एकीकडे उमेदवार प्रचारफेऱ्यांत व्यस्त असताना संपर्क कार्यालयांमध्ये मतदारयाद्यांवर काम सुरू आहे आणि त्यासाठी संगणक साक्षर कार्यकर्त्यांचा भाव वाढला आहे.
मतदानाच्या दिवशी संगणकाची कळ दाबताच मतदाराचे नाव, त्याचे मतदान केंद्र याची माहिती चुटकीसरशी संगणकाच्या पडद्यावर दिसावी यासाठी मतदान केंद्रांवर काम करण्यासाठी सॉफ्टवेअर अभियंत्यांसह संगणक साक्षर कार्यकर्त्यांना मागणी वाढली आहे. यंदाच्या निवडणुकीत माहिती तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करून घेतला जात आहे. त्यातच सोशल मीडियामुळे तर प्रचाराचे माध्यम आणखी सोपे झाले आहे. पूर्वी उमेदवारांची नावे शोधण्यासाठी निवडणूक कार्यालयाकडून उमेदवारांना मतदार यादी घेऊन यावी लागत असे. याच मतदार याद्यांची झेरॉक्स काढून त्या बूथनिहाय कार्यकर्त्यांकडे पोहोचविल्या जायच्या; परंतु आता प्रमुख राजकीय पक्षांसह काही सुशिक्षित व आर्थिकदृष्ट्या सबल उमेदवारांनी संगणकीय मतदार यादी तयार करत त्यादृष्टीने मतदारांशी संपर्क सुरू केला आहे. मतदानाच्या दिवशी बूथनिहाय लॅपटॉपच उपलब्ध करून देण्याचे काही उमेदवारांनी ठरविल्याने संगणक साक्षर कार्यकर्त्यांचा भाव वाढला आहे. संगणकाची कळ दाबल्यानंतर तत्काळ संबंधित मतदाराची माहिती उपलब्ध होणार असल्याने बूथवर मतदारांच्या होणाऱ्या गर्दीवरही नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे. याशिवाय मतदानाची गतीही वाढवता येणार आहे. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही बूथवर उमेदवारांनी संगणकाच्या माध्यमातून मतदारांची नावे शोधून त्यांच्या चिठ्ठ्या करून देण्याचे काम केले होते. आताही विधानसभा निवडणुकीत संगणकाचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार असून, त्यासाठी संगणक अभियंत्यांसह संगणक साक्षर कार्यकर्ते जवळ बाळगणे उमेदवार पसंत करत आहेत.

Web Title: Computer literate workers increased prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.