मोजमाप पुस्तिकेचेही आता संगणकीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 01:27 AM2019-03-30T01:27:19+5:302019-03-30T01:27:52+5:30
प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पीएमएस) प्रणालीमध्ये तांत्रिक दुरुस्ती करून यापुढे बांधकाम, लघु पाटबंधरे तसेच पाणीपुरवठा विभागातील प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या मोजमाप पुस्तिकाही संगणकीकृत पद्धतीनेच करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
नाशिक : प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पीएमएस) प्रणालीमध्ये तांत्रिक दुरुस्ती करून यापुढे बांधकाम, लघु पाटबंधरे तसेच पाणीपुरवठा विभागातील प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या मोजमाप पुस्तिकाही संगणकीकृत पद्धतीनेच करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
प्रशासकीय कामकाजातील गतिमानता आणि जिल्ह्णाने यासाठी घेतलेला पुढाकार लक्षात घेऊन राज्य शासनाने पीएमएसप्रणाली राबविण्यासाठी नाशिक जिल्ह्याची निवड केली होती. याबाबत आज जिल्हा परिषदेस ग्रामविकास विभागाचे पत्र प्राप्त झाले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली. जिल्ह्णात प्रायोगित तत्त्वावर अंगणवाडींच्या दुरुस्तीची कामे करण्यात आली आहे. यासाठी शासनाने सीडॅक या शासकीय संस्थेची निवड केली असून, या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्णातील बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा यातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यास पेपरलेस कारभार होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे विनाविलंब देयक अदा करता येणे सोपे होणार आहे.
या प्रकल्पात काही सुधारणा करण्याबाबत जिल्हा परिषदेने ग्रामविकास विभागास प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार शासनाने ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम विभाग व लघु पाटबंधारे विभाग या प्रकल्पांसाठी कामाची मोजमाप पुस्तिका प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीममधील संगणीकृत पद्धतीने राबविण्यास मान्यता दिली आहे.