अभिनव उपक्रमांचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:45 AM2019-07-29T00:45:37+5:302019-07-29T00:45:59+5:30
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन अध्यक्ष म्हणून न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी मावळते अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्याकडून कार्यभार स्वीकारला असून, रविवारी झालेल्या या सभेत विविध अभिनव उपक्रमांचा संकल्प जाहीर करण्यात आला.
नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन अध्यक्ष म्हणून न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी मावळते अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्याकडून कार्यभार स्वीकारला असून, रविवारी झालेल्या या सभेत विविध अभिनव उपक्रमांचा संकल्प जाहीर करण्यात आला.
कुसुमाग्रजांसह चार ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी साहित्यिकांच्या जीवनावरील चरित्रपट, युवा कलाकारांना व्यासपीठ देणारा उपक्रम, मान्यवर लेखकांचे अभिवाचन अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. श्रीराम बॅँकेत अडकलेल्या ९ लाख रुपयांच्या ठेवी परत मिळवण्यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सर्वसाधारण सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. मावळते अध्यक्ष कर्णिक यांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. या अध्यक्षपदाच्या कालखंडात जमलेल्या सर्व स्नेही आणि साहित्यप्रेमी कार्यकर्त्यांचा स्नेह कायम राहील, असा विश्वास वाटत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच १९५८ सालापासून ज्यांच्याशी मैत्रीचे धागे जुळलेले आहेत, त्या न्या. चपळगावकर यांना सूत्रे सोपवत असल्याने समाधानदेखील असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे तारुण्यात जुळलेला आमचा दोघांचा स्नेह तब्बल ६० वर्षांनंतरही कायम राहिल्याचे समाधान आहे, असेही कर्णिक यांनी नमूद केले. विषयपत्रिका आणि इतिवृत्ताचे वाचन कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी केले.
ऐनवेळच्या विषयांमध्ये आमदार हेमंत टकले यांनी तात्यासाहेबांसह वि. स. खांडेकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या चौघा ज्ञानपीठ विजेत्या मराठी साहित्यिकांच्या जीवनावर चरित्रपट बनवला जात असल्याचे सांगितले. मुंबईमध्ये प्रख्यात कलाकारांच्या उपस्थितीत त्याच्या चित्रीकरणास प्रारंभ करण्यात आला असून, प्रत्येक लेखकावर सुमारे तासभराचा हा चरित्रपट बनवण्यात येणार असून, येत्या दिवाळीत तो सर्वांसाठी उपलब्ध होणार असल्याचे टकले यांनी नमूद केले. तर अॅड. विलास लोणारी यांनी मानांकित साहित्याच्या अभिवाचनाचा उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. आर्किटेक्ट संजय पाटील यांनी युवाचित्र चळवळ अंतर्गत दर्जेदार चित्रपट दाखवून त्यांचे रसग्रहणाचा उपक्रम सातत्याने घेणार असल्याचे नमूद केले. विविध विषयांवरील चर्चेत कार्यवाह मकरंद हिंगणे, डॉ. यशवंत बर्वे, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनीदेखील त्यांची मते मांडली.
थकीत निधीसाठी समिती
प्रदीर्घ काळापासून श्रीराम बॅँकेत थकीत असलेल्या
नऊ लाख रुपयांचा निधी परत मिळवण्याबाबत काय कार्यवाही झाली, असा मुद्दा श्रीकांत बेणी यांनी उपस्थित केला. त्यावर आमदार टकले यांनी कोषाध्यक्ष विनय ठकार, नूतन विश्वस्त अॅड. अजय निकम, अॅड. राजेंद्र डोखळे आणि श्रीकांत बेणी यांची समिती गठित करून त्या समितीची महिन्याभरात बैठक घेत निधी परत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सूत्रे म्हणजे
माइक सोपवतो
मावळते अध्यक्ष कर्णिक यांनी भाषणाच्या अखेरीस आता मी नूतन अध्यक्ष न्या. चपळगावकर यांच्याकडे पदाची सूत्रे म्हणजे हा माइक सोपवतो, असे सांगत सूत्रे हस्तांतरित केली. त्यानंतर न्या. चपळगावकर हे उभे राहून बोलायला लागल्यावर अन्य सभासदांनी त्यांना बसून बोलण्याची विनंती केली. त्यावर कर्णिक यांनी बसून न्याय देतात, वकिली ही उभे राहूनच करावी लागते असे म्हणताच सभेत हंशा पिकला.