कंत्राटाविषयी संशयकल्लोळ
By Admin | Published: November 27, 2015 10:43 PM2015-11-27T22:43:15+5:302015-11-27T22:45:19+5:30
पाणवेली हटविण्याचा प्रस्ताव
नाशिक : गोदावरी नदीपात्रातील पाणवेली व निर्माल्य फ्लोटिंग ट्रॅश स्किमर मशिनरीमार्फत हटविण्यासाठी आठ तासांकरिता ५५ हजार रुपये मोजण्याच्या प्रस्तावाबाबत स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी संशय व्यक्त केला. आरोग्याधिकाऱ्यांनी सदर खर्च सिंहस्थ निधीतून होणार असल्याचे उत्तर दिल्यानंतर सभापतींनी जेव्हा पाणवेली असेल तेव्हाच त्याचा वापर करण्यास मंजुरी दिली.
गोदावरी नदीपात्रातील पाणवेली, निर्माल्य व तत्सम तरंगत्या वस्तू हटविण्यासाठी मुंबईतील क्लिनटेक इंडिया या संस्थेकडून तीन महिने कालावधीसाठी ५५ हजार रुपये प्रति शिफ्ट व प्रति मशीन काम करून घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाबाबत बोलताना प्रा. कुणाल वाघ यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत संशय व्यक्त केला. आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी सदर संस्थेने यापूर्वी सिंहस्थात मोफत काम केल्याचे स्पष्ट केल्यानंतर तर सदस्यांचा संशय आणखी बळावला. वाघ यांनी सांगितले, अगोदर फुकट काम करायचे आणि नंतर कोट्यवधी रुपयांचे कंत्राट पदरात पाडून घ्यायचे. हा सारा व्यवहारच संशयास्पद असून, त्याची सविस्तर माहिती मिळेपर्यंत प्रस्ताव तहकूब ठेवण्याची मागणी केली. यापूर्वी अवघ्या दोन लाखांत मजूर संस्थांमार्फत पाणवेली काढण्याचे काम केले जात होते, याची आठवणही वाघ यांनी करून दिली.
सुरेखा भोसले यांनीही आता सद्यस्थितीत पाणवेली नसताना सदरचा प्रस्ताव स्थायीवर कशासाठी आणल्याचा जाब विचारला आणि घंटागाडी व पेस्टकंट्रोलच्या ठेक्याबाबत उदासीन असलेल्या प्रशासनाच्या या तत्परतेबद्दल त्यांनी आश्चर्यही व्यक्त केले. त्यावर आरोग्याधिकारी डॉ. डेकाटे यांनी सांगितले, सध्या या मशिनरीची गरज नाही परंतु सिंहस्थ निधी परत जाऊ नये यासाठी मान्यतेकरिता प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)