खामखेडा परिसरात चिंता
By Admin | Published: February 11, 2015 11:32 PM2015-02-11T23:32:27+5:302015-02-11T23:32:45+5:30
खामखेडा परिसरात चिंता
खामखेडा : बेमोसमी पावसाने मंगळवारी जोरदार हजेरी लावल्याने खामखेडा परिसरातील शेतकरी चिंतातुर झाले आहेत. चालू वर्षी बेमोसमी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात खामखेडा परिसरात काही ठिकाणी पाऊस झाला होता. तेव्हा कांद्याच्या रोपांचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात परत वातावरणात बदल होऊन तुरळक पाऊस झाला होता, तेव्हा लागवड केलेल्या कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी करुन पिके वाचवली होती. त्यास पंधरा-वीस दिवस झाले नाही तोच मंगळवारी दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार होऊन सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.
अचानक आलेल्या बेमोसमी पावसामुळे शेतातील काढणीस आलेला व शेतात काढून ठेवलेला रांगडा कांदा भिजला. आता गहू, हरभरा उन्हाळी कांदा ही पिके जोमात आहेत. परंतु बेमोसमी पावसामुळे गहू पिकावर तांबोरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घाटे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या हरभऱ्यावर अळया पडून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. उन्हाळी कांद्याची उशिरा लागवड झाल्यामुळे पीक जोमात असले तरी पावसामुळे कांद्याची पात पिवळी पडून करपा रोग पडून कांदा चाळीत टिकणार नाही, तसेच कांदा बियाण्याचे डोंगळे आता बियाणे दाणे भरण्याचे मोसमात आहे, पंरतु या पावसामुळे फुलोरा गळून बियाण्यात घट निर्माण होऊन पुन्हा मागच्या वर्षीसारखी बियाणे टंचाई निर्माण होईल की काय, हा प्रश्न आता शेतकऱ्याला सतावत आहे. (वार्ताहर)