एबी फॉर्मची चिंता, उद्यापर्यंतच मुदत
By admin | Published: February 2, 2017 01:36 AM2017-02-02T01:36:31+5:302017-02-02T01:36:44+5:30
धडधड वाढली : उमेदवारांचा जीव टांगणीला
नाशिक : आॅनलाइन प्रणालीद्वारे अर्ज भरून झाला, निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्जाची प्रतही दाखल झाली, परंतु जोपर्यंत पक्षाकडून अधिकृत उमेदवारीचा एबी फॉर्म मिळत नाही तोवर पक्षीय उमेदवारी अंतिम होणार नाही. यंदा महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांच्या चिन्हांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना एबी फॉर्म नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंतच जमा करता येणार आहे. राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवार घोषित करण्यास विलंब लावला जात असल्याने इच्छुक उमेदवारांची धडधड वाढली असून, साऱ्यांचा जीव एबी फॉर्ममध्ये अडकला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी दि. २७ जानेवारीपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, सहा दिवस उलटून गेल्यानंतर केवळ १११ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आता अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. अद्याप राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची अधिकृतपणे घोषित करण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारी अर्जावर पक्षाचे अधिकृत नाव टाकायचे किंवा नाही, या चिंतेत उमेदवार आहेत. त्यामुळे अनेक उमेदवारांनी पक्षाचे नाव न टाकताच अर्ज दाखल करून ठेवले आहेत. राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना अर्जासोबत एबी फॉर्म जोडणे बंधनकारक आहे. यापूर्वी महापालिका निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांकडून मिळणारे एबी फॉर्म अर्ज माघारीच्या प्रक्रियेपर्यंत जमा करण्याची मुभा होती. परंतु, यंदा राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी एबी फॉर्म हा नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंतच जमा करता येणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी दि. ३ फेबु्रवारीपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. आता अर्ज दाखल करण्यासाठी दोनच दिवस उरले असल्याने मुदतीत अर्जासोबत एबी फॉर्म जोडण्यासाठी राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची धावपळ उडणार आहे. दोन दिवस उमेदवारांचे एबी फॉर्मकडेच डोळे लागणार असून आपला ऐनवेळी पत्ता कट होणार नाही, याचीही खबरदारी घेतली जात आहे. (प्रतिनिधी)