औषधांची वाहने अडकून पडल्याने चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 05:05 PM2020-03-30T17:05:48+5:302020-03-30T17:06:10+5:30
नाशिकमध्ये दिल्ली, कर्नाटक, हरयाना, पंजाब आदी राज्यांमधून तसेच मुंबई, पुणे, अकोला, अमरावती आदी जिल्ह्यांमधून एसटी, ट्रक आणि खासगी वाहनाने औषधांचे पार्सल येतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : कोरोनाचा धोका वाढला असतानाच नाशिक शहरात व जिल्ह्यात औषधांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. घाऊक विक्रेते असलेल्या गोळे कॉलनीतही स्टाक मर्यादित आहे. देशभर लाकडाउन व संचारबंदी लागू आहे. औषधांचे ट्रक दुसऱ्या राज्यात व जिल्ह्यांमध्ये अडकून पडले आहेत. सरकारने त्यांना परवानगी दिलेली असली तर वाहतूक संघटना, ट्रकचालक धोका पत्करण्यास तयार नाहीत.
नाशिकरोडच्या औषध विक्रेत्यांनी सांगितले की, नाशिकमध्ये दिल्ली, कर्नाटक, हरयाना, पंजाब आदी राज्यांमधून तसेच मुंबई, पुणे, अकोला, अमरावती आदी जिल्ह्यांमधून एसटी, ट्रक आणि खासगी वाहनाने औषधांचे पार्सल येतात. हा माल ठक्कर बाजाराला येतो. मात्र, एसटी वाहतूक व कार्यालय बंद असल्याने माल सोडवता आलेला नाही. हरियाना व पंजाबमधील व्हीआरएल, गती, टीसीआय एक्स्प्रेस या ट्रान्सपोर्ट कंपन्या औषधे व जीवनावश्यक माल पाठवितात. मात्र, कोरोनामुळे जारी केलेल्या संचारबंदीमुळे औषधांचे ट्रक प्रवासातच थांबलेले आहेत. सध्या सॅनिटायझर, मास्क, कफ सिरफ, पॅरासिटॅमाल, क्लोरिक्वीन, हायड्रो क्लोरीक्वीन, संसर्गाला प्रतिबंध करणारी औषधांना मागणी वाढली आहे. नेमका हाच माल अडकून पडलेला आहे. सध्याची औषधे व माल जास्तीत जास्त दोन दिवस चालेल, नंतर औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. घाऊक औषध विक्रेते असलेल्या नाशिकच्या गोळे कॉलनीतही अशीच स्थिती आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले. सध्याच्या आणीबाणीच्या काळात औषध कंपन्या चालू ठेवाव्यात असे सरकारचे धोरण आहेत. संचारबंदीतून औषध व अन्य जीवनावश्यक मालाच्या वाहतुकीला सूट देण्यात आलेली असली तरी अंमलबजावणी होत नाही. मालवाहतूक संघटना धोका घेण्यास तयार नाहीत. त्यांना पोलीस संरक्षण हवे आहे. नाशिकरोडला किरकोळ व घाऊन मिळून दोनशेच्यावर औषध विक्रीची दुकाने आहेत. त्यांनाही औषध टंचाईची समस्या येऊ शकते. मास्क, सॅनिटायझर, संसर्गजन्य औषधांची मागणी सध्या जास्त आहे. हा माल नसल्यामुळे ग्राहक निराश होत आहेत.