ऋतुरंग सांस्कृतिक कला महोत्सवाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:32 AM2019-01-30T00:32:54+5:302019-01-30T00:33:17+5:30
ऋतुरंग भवनमध्ये आयोजित तीन दिवसीय ऋतुरंग कला व सांस्कृतिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
नाशिकरोड : ऋतुरंग भवनमध्ये आयोजित तीन दिवसीय ऋतुरंग कला व सांस्कृतिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
ऋतुरंग परिवाराच्या वतीने बिझनेस बॅँक, दीपक बिल्डर्स व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने आयोजित केलेल्या तीन दिवसीय ऋतुरंग कला व सांस्कृतिक उत्सवात पहिल्या दिवशी उद्घाटनानंतर पंचरत्न हा संगीतमय कार्यक्रम पार पडला. दुसऱ्या दिवशी ‘संवादरंग’ या कार्यक्रमात माझ्या नव्याची बायको या गाजलेल्या मालिकेतील अभिजित खांडकेकर (गुरूनाथ) व अनिता दाते (राधिका) यांची प्रकट मुलाखत तन्वी अमित हीने घेतली. यावेळी अभिनय किंवा कोणतेही क्षेत्र असो, यशाचा फॉर्म्युला नसतो. यशासाठी जिद्द, कठोर मेहनत, बारीक अभ्यासाची गरज असते. वेळेची कदर करा. देरे हरी खाटल्यावरी अशी तुमची धारणा असेल तर काहीच मिळणार नाही, असे खांडकेकर व दाते यांनी स्पष्ट केले. नाशिकच्या या कलाकारांनी आपल्या चतुरस्त्र अभिनयाने फिल्म इंडस्ट्रीत ठसा उमटवला आहे. ही काटेरी वाटचाल कशी केली, यश कसे मिळवले याचे रहस्य या दोघांनी मुलाखतीत सांगितले.
ऋतुरंग महोत्सवाच्या रविवारी समारोपाच्या दिवशी ‘एमएच १५ बॅन्ड’ या कार्यक्रमात गायक राहुल आंबेकर आणि सनी वाघ यांनी हिंदीसह विविध प्रादेशिक भाषेतील गाजलेली गाणे सादर केली. त्यांना ड्रमवर विनेश नायर, की बोर्डवर गणेश जाधव यांनी साथसंगत केली. यावेळी रसिक उपस्थित होते.