स्वयंपाक घरातील किराणा मालाअभावी नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:14 AM2021-05-16T04:14:45+5:302021-05-16T04:14:45+5:30
नाशिक : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊनची घोषणा करीत किराणा दुकानदारांनाही केवळ घरपोच सेवाच सुरू ठेवण्याची ...
नाशिक : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊनची घोषणा करीत किराणा दुकानदारांनाही केवळ घरपोच सेवाच सुरू ठेवण्याची सवलत दिली आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या किराणा दुकानदारांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करीत पुकारलेला बंद तिसऱ्या दिवशीही कायम असल्याने नागरिकांचे दैनंदिन गरजेच्या किराणा मालाअभावी सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून प्रशासनाच्या किरकोळ किराणा दुकानदारांविषयीच्या उदासीन भूमिकेचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचे प्रतिक्रिया ग्राहकांमध्ये उमटत आहे.
जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे किराणा दुकानदारांनी बंद पाळण्याची भूमिका घेतल्याने शहरातील रोजंदारीचे काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. हातात पैसे असतील तरच किराणा खरेदी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या घटकाला किराणा मालातील तेल, मीठ, मिरचीसह अन्न धान्यासाठी उसनवार करून कुटुंबाची गरज भागविण्याची वेळ आली आहे. किराणा दुकानदारांच्या बंदमुळे हातावर पोट असल्याने रोज अर्धा किलो एक किलो किराणा मालातील वस्तू घेण्याचा पर्यायच संपुष्टात आला आहे. त्यामुळे किमान काही वेळासाठी तरी किराणा मालाची दुकाने उघडण्यात यावी, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.
कोट-
स्वयंपाक घरात लागणाऱ्या रोजच्या गरजेच्या वस्तुंसाठी वेळेवर पैसे असले तरच त्या विकत घेता येतात, प्रशासनाने घोषणा केल्यानंतर तत्काळ किराणा भरणे शक्य नव्हते आता दुकानदारांशी संपर्क केला. परंतु, ते घरपोच किराणा देण्यास तयार होत नाही. त्यामुळे काही वेळासाठी तरी दुकाने उघडायला हवी
- अंजली पवार, गृहिणी
कोट-
किरकोळ किराणा दुकानदारांना काही वेळासाठी दुकाने उघडण्याची सवलत मिळाली तर सर्वसामान्य ग्राहकांचे प्रश्न सुटू शकतील. अर्धा किलो, पावशेर किराणा मालाची घरपोच सेवा देता येत नाही. दुकानाचे शटरही उघडता येत नाही. त्यामुळे दुकानासोबतच व्यवसायही प्रशासनाकडून सूचना मिळत नाही तोवर बंदच ठेवण्याची भूमिका दुकानदारांनी घेतली आहे.
-महेंद्रभाई पटेल, अध्यक्ष, किरकोळ किराणा व्यापारी संघटना, नाशिक