अपंगांप्रश्नी पालिकेकडून चुकांची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 01:07 AM2017-07-25T01:07:01+5:302017-07-25T01:07:17+5:30

नाशिक : महापालिका अपंगांसाठी राखीव ठेवण्यात येणारा तीन टक्के निधी खर्च करू शकली नाही, अशी कबुली मनपाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Confessions of a cop | अपंगांप्रश्नी पालिकेकडून चुकांची कबुली

अपंगांप्रश्नी पालिकेकडून चुकांची कबुली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : विदर्भातील अचलपूरचे अपक्ष आमदार व प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी अपंगांच्या प्रश्नी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आपल्या आक्रमक शैलीत जाब विचारल्यानंतर महापालिका अपंगांसाठी राखीव ठेवण्यात येणारा तीन टक्के निधी खर्च करू शकली नाही, अशी कबुली मनपाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी, मागील आर्थिक वर्षाचा निधी येत्या सप्टेंबरपर्यंत तर चालू आर्थिक वर्षाचा निधी मार्च २०१८ अखेर खर्च करण्याची हमी घेतल्यानंतरच कडू यांनी आयुक्तांचे दालन सोडले. प्रहार संघटनेने अपंगांच्या विविध प्रश्नांवर महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. त्यानंतर आमदार बच्चू कडू यांच्यासमवेत शिष्टमंडळाने आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन चर्चा करायला सुरुवात केली असता,  आयुक्त व कडू यांच्यात शाब्दीक चकमकी झडल्या. त्यामुळे आयुक्त चर्चा सोडून निघून गेले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, प्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ, शहर अभियंता उत्तम पवार, मुख्य लेखापाल सुभाष भोर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी कडू यांच्याशी चर्चा करत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मागील वर्षी राखीव तीन टक्के खर्च करू शकलो नसल्याची कबुली यावेळी अधिकाऱ्यांनी दिली तर यावर्षीच्या अंदाजपत्रकात महासभेने १० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे सांगितले. परंतु, कडू यांनी अखर्चित निधीबद्दल जाब विचारत अधिकाऱ्यांना असभ्य भाषाही वापरली. अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे व प्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी निधी खर्च करण्याबाबत आश्वस्त केले शिवाय, सन २०१३ मध्ये अपंगांच्या नोंदणीत ५०८ जणांची नोंदणी झाल्याचेही स्पष्ट केले. परंतु, कडू यांनी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली. अपंग लाभार्थ्यांचे आशा कर्मचाऱ्यांमार्फत तातडीने सर्वेक्षण करा, सर्वेक्षणाचे काम एनजीओमार्फत करू नका, घरकुल योजनेत अपंग लाभार्थ्यांना प्राधान्य द्या, त्यांना गाळ्यांचे वाटप करा, अपंग खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना शिष्यवृत्ती द्या, त्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी निधी उपलब्ध करून द्या, महापालिका कार्यालयांमध्ये अपंग कर्मचाऱ्यांसाठी रॅम्प बनवा आदी सूचनाही कडू यांनी केल्या. यावेळी अधिकाऱ्यांनी त्याबाबत सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले.
उपआयुक्तांवरही कारवाईची मागणी
एका अपंग बांधवाने पाचदा स्मरणपत्रे देऊनही त्याला साधे उत्तर देण्याची तसदी मनपाने दाखविली नसल्याने बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी कडू यांनी स्मरणपत्रांच्या तारखांचे वाचन करत अपंगांना सन्मानाने वागणूक न देणाऱ्या उपआयुक्तांवर तातडीने कारवाईची मागणी केली. कारवाई केली नाही तर त्या अधिकाऱ्यासाठी आपण पुन्हा स्पेशल येऊ, असा दमही कडू यांनी भरला. कडू यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अधिकारीवर्ग मात्र पुरता हादरला होता.
 

Web Title: Confessions of a cop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.